Just another WordPress site

अमळनेर येथील होणारे मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्ह अनावरण प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची स्पष्टोक्ती

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ ऑक्टोबर २३ सोमवार

तब्बल ७२ वर्षांनंतर अमळनेर येथे मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवर मंथन होणार असल्यामुळे हे संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे ठरेल असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज दि.२ ऑक्टोबर सोमवार रोजी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बोधचिन्ह अनावरण प्रसंगी व्यक्त केला.सदरील साहित्य संमेलन हे पुढच्या पिढीला आदर्श ठरेल याकरिता हे संमेलन यशस्वीरित्या आपल्या सर्वांना पार पाडायचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात अनिल पाटील बोलत होते.प्रसंगी व्यासपीठावर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी,माजी आमदार स्मिता वाघ,डॉ.बी.एस.पाटील,शिरीष चौधरी,मराठी वाङ्‌मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी,खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल,बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलिंद भामरे या मान्यवरांच्या उपस्थितीत बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.सदरील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दि. २,३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथे होत आहे.प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की,बोधचिन्हाची निर्मिती येथील भूमीपुत्राने केली याचा माझ्यासारख्या भूमीपुत्राला अभिमान आहे.सदरहू अतिशय उत्कृष्ट बोधचिन्ह तयार करून बोधचिन्हाच्या माध्यमातून जगाच्या व्यासपीठावर खान्देशची प्रतिमा उमटवली असून सदर बोधचिन्ह जगात नावलौकिक करेल अशी प्रत्येक गोष्ट या बोधचिन्हात घेतली आहे.अमळनेर सारख्या छोट्या गावात १९५२ साली साहित्य संमेलन झाले.प्रताप कॉलेज,प्रताप शेटजींनी पूर्वजांनी तत्वज्ञान मंदिराच्या माध्यमातून जगात प्रसिद्ध आहे.साने गुरुजींची चळवळ येथून झाली याचा सर्व अभ्यास करून येथे साहित्य संमेलनसाठी परवानगी दिली. परिणामी सदरील साहित्य संमेलन महाराष्ट्राला दिशा देणारे साहित्य संमेलन येथे होईल असा विश्वास व्यक्त करत साहित्य संमेलन प्रत्येकाने यशस्वी करून दाखवावे अशी अपेक्षाही अनिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.‌

मातृभाषा हिच शिक्षणाची भाषा असल्यास प्रगती : कुलगुरु डॉ.विजय माहेश्वरी

बोधचिन्हाचे उद्घाटक कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी म्हणाले की,तब्बल ७२ वर्षानंतर अमळनेर येथे होणारे साहित्य संमेलन आत्मीयतेचा विषय आहे.अमळनेर सांस्कृतिक राजधानी आहे.संत सखाराम महाराज यांची पुण्यभूमी,सानेगुरुजी कर्मभूमी,दानशूर व्यक्तिमत्व प्रताप शेठ व विप्रो समुहाचे संस्थापक अजीम प्रेमजी यांची उद्योगभूमी आहे.शाळेची पायरी देखील न चढणाऱ्या बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला दिले हे जगातली अद्भुत घटना आहे.बहिणाबाईंनी आपल्या कवितांमधून जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे.मातृभाषेतून शिक्षण परिपक्व करते.मातृभाषेचे खूप महत्त्व आहे.विद्यापीठाच्या माध्यमातून पाच अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध केले आहेत.मराठी साहित्य संमेलन खास असून खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे.शैक्षणिक क्षेत्रात मराठी भाषेचा अपेक्षित वापर होत नाही यासाठी आपल्याला मानसिकता बदलण्याची गरज आहे.मातृभाषा हिच शिक्षणाची भाषा असेल तर विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द होते असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला असल्याचेही कुलगुरुंनी म्हटले आहे.

संपूर्ण खान्देशसाठी अभिमानाची बाब : डॉ.अविनाश जोशी

यावेळी माजी आमदार स्मिता वाघ,‌शिरीष चौधरी‌ यांनी ही मनोगत व्यक्त केले.संमेलनाच्या बोधचिन्हात संपूर्ण खान्देशीच ओळख दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रास्ताविक करतांना मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी म्हणाले की ७२ वर्षांनंतर संमेलन आयोजनाचा मान आपल्याला मिळला आहे ही संपूर्ण खान्देशसाठी अभिमानाची बाब आहे यामुळे सर्व खान्देशवासियांनी एकत्र येवून हा सोहळा साजरा करावयाचा आहे असे आवाहन करत त्यांनी संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली.बोधचिन्ह साकारणारे प्राचार्य मिलिंद भामरे यांनी बोधचिन्हाबाबत थोडक्यात माहिती दिली.मी अमळनेरचा आहे माझ्याकडून परमेश्वराने ही सेवा करून घेतली असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.

याप्रसंगी नरेंद्र निकुंभ,शरद सोनवणे,शामकांत भदाणे,रमेश पवार,सोमनाथ ब्रम्हे,प्रदीप साळवी,पी.बी.भराटे,बन्सीलाल भागवत,स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे,भैय्यासाहेब मगर,शाम पवार,शिला पाटील,रजनीताई केले,साहित्यिक कृष्णा पाटील,शरद धनगर,रेखा पाटील,सुनिता पाटील, सुभाष पाटील घोडगावकर,हिरामण कंखरे,शाम अहिरे,मनोज पाटील,गोकुळ बोरसे,भागवत सूर्यवंशी,सुलोचना वाघ,नयना पाटील,माधुरी पाटील,विनोद पाटील,प्रदीप अग्रवाल,विद्या हजारे,ब्रह्मकुमारी विद्यादेवी,डॉ.रामलाल पाटील,पूनम साळुंखे,डॉ.चंद्रकांत पाटील,हरि भिका वाणी, बजरंग अग्रवाल,नीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.सदरील संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती यात प्राचार्य मिलिंद भामरे यांनी साकारलेल्या बोधचिन्हाची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बोधचिन्हात जळगावसह संपूर्ण खान्देशाती संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले असून बोधचिन्हात लेखणी,केळीची पाने,मराठीचा म,बहिणाबाईंचा जातं,ग्रामीण भागाचे वाद्य संबंळ,आदिवासी वाद्य तरपा, माता सरस्वतीचे बोधचिन्ह,सखाराम महाराज मंदिर मंगळग्रह मंदिराच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला आहे तसेच चिन्हाखाली ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ या ओळी लिहिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.