शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपारसह एन्काऊंटर करण्याची पोलीस उपायुक्त यांची धमकी
शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांचा गंभीर आरोप
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-शिवसेना शिंदे गटात सामील न झाल्यास तडीपार करून आपला एन्काऊंटर करण्याची धमकी देत परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी १० लाख रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटातील माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी केला आहे.गेल्या काही दिवसांपासून आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याचा घाट शिंदे गट पोलिसांच्या माध्यमातून करत आहे.त्यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी आमदार संदीप नाईक व विजय चौगुले हे जबाबदार राहतील असे एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.यावेळी खासदार राजन विचारे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची त्वरित बदली न केल्यास सहकुटुंब आत्महत्या करण्याचा इशारा एम.के. मढवी यांनी दिला आहे.एम.के.मढवी यांच्यावर अनेक जुने गुन्हे दाखल असतानाच त्यांच्यावर यावर्षी देखील तीन अन्य गुन्हे दाखल झाले असल्यामुळे त्यांच्यावर तडीपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्याकरिता त्यांना नोटीस बजावण्यात आली होती.त्यामुळे आपल्यावर तडीपारीची कारवाई होईल या भीतीने ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.