रस्ता काँक्रीटीकरण व गटारीचे निकृष्ठ कामाबद्दल ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्याची राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ ऑक्टोबर २३ मंगळवार
येथील अत्यंत वाहनांच्या वर्दळीच्या यावल भुसावळ मार्गावर सद्या रस्ता काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम सुरू असुन या कामावर संबंधीत ठेकेदार निविदा अटींचा भंग करून माती मिश्रीत वाळु आणी कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करीत असल्याने सदर कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की,यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील अवजड वाहनांसह दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या यावल ते भुसावळ मार्गावरील जुना भुसावळ नाक्यापासुन तर नाल्यापर्यंतच्या गटारी बांधकाम व रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.दरम्यान सदर काम करणाऱ्या ठेकेदाराकडून शासकीय निविदा व अटीशर्ती धाब्यावर ठेवुन अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट व नाल्याची माती मिश्रीत वाळुचा वापर करून अत्यंत निकृष्ठ प्रतिचे काम केले जात आहे.सदरील मार्गावर नेहमीच परप्रांतातुन येणारी अवजड वाहनासह ईतर वाहनांच्या वाहतुकीची मोठी वर्दळ असल्यामुळे निकृष्ठ प्रतिचे साहित्य वापरून तयार होणारा हा काँक्रीटचा रस्ता फार काळ टिकणार नाही त्याचप्रमाणे संबधीत ठेकेदाराकडुन सदरचे काम हे कासवगतीने करण्यात असल्याने भुसावळकडे जाणाऱ्या ईतर वाहनांचा मार्ग हा दुसरीकडे वळविण्यात आल्याने वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सोसावे लागत असुन अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तरी संबधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील कामाची त्वरीत चौकशी करून शासकीय नियम धाब्यावर ठेवुन काम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य कारवाई करावी.सदरहू कारवाई न झाल्यास राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असुन प्रसंगी न्यायालयात देखील दाद मागण्यात येईल असेही प्रा.मुकेश येवले यांनी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.