मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-नावातील साधर्म्यामुळे दोन मृतदेहांची अदलाबदली झाल्याचा प्रकार पनवेलजवळील कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात घडला.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहांची अदलाबदल केल्याने मृतांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.अलिबागमधील पेझारी येथे वास्तव्यास असलेल्या रमाकांत पाटील(वय ६२ वर्षे)यांचे कुटुंबीय मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या शवागार गृहाजवळ पोहोचले.त्यानंतर काही वेळात पनवेलच्या दहिवली भागातील एक कुटुंब त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णालय परिसरात आले.राम पाटील(वय ६६ वर्षे)असे मृत व्यक्तीचे नाव होते.रमाकांत पाटील यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पेझारी गाठले.अंत्यसंस्कार करताना त्यांना मृतदेहाबद्दल शंका आली.मृतदेहाच्या मिशीचा आकार आणि रंग वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी मृतदेहाचा फोटो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पाठविल्यावरदेखील रुग्णालयाने चूक मान्य केली नाही.
मृतदेह आपल्या माणसाचा नसल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही व्यक्तींच्या कुटुंबीयांनी रुग्णालय गाठले.त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने दोन्ही मृतदेहांची अदलाबदल केली.मृतदेह ताब्यात देण्याआधी ते नातेवाईकांना दाखवण्यात आले होते मात्र दोन्हीकडून कोणीच आक्षेप घेतला नाही.त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार द्यायला हवा होता असे एमजीएमच्या प्रवक्त्यांनी सांगितले.रमाकांत पाटील गावात ज्युस विक्रीचा व्यवसाय करायचे तर राम पाटील शेतकरी होते.रमाकांत यांना रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा त्रास होता.तर राम यांना किडणी आणि यकृताच्या समस्या होत्या.राम यांचा मृतदेह स्वीकारताना त्यांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला होता.मात्र शवागार गृहातील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले अशी माहिती राम यांचे नातेवाईक असलेल्या संजय पाटील यांनी दिली आहे.