Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ नोव्हेंबर २३ सोमवार
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे दि.२६ नोव्हेंबर रविवार रोजी बीड दौऱ्यावर असतांना एका भावी महिला शिक्षिकेने शिक्षक भरतीवरून दीपक केसरकर यांना प्रश्न विचारल्यावर दीपक केसरकर चांगलेच संतापले.परिणामी शिक्षक भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे तर तुम्ही मला विचारायला कसे आलात? असा प्रतिसवाल दीपक केसरकर यांनी सदरील महिलेला उपस्थित केला.बीडमधील एका कार्यक्रमानंतर दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना भावी महिला शिक्षिकेने दीपक केसरकरांना शिक्षक भरतीवरून प्रश्न विचारले की, “शिक्षक भरतीची वाट पाहून आम्ही खूप थकलो आहे.संकेतस्थळ सुरू आहे,नोंदणी सुरू आहे पण पुढे प्रक्रिया होतच नाही.जाहीरातच आली नाही तर चॉइस कसा देणार? जाहीरात कधीपर्यंत येणार?आम्ही पाच वर्षापासून जाहीरातीची वाट पाहतोय अशा प्रश्नांची सरबत्ती महिलेने दीपक केसरकरांना केली यानंतर दीपक केसरकर यांनी या महिलेला चांगलेच ठणकावून सांगितले की,“तुम्हाला अजिबात कळत नाही.तुम्ही शिक्षक होऊ शकता का?तुमचे संकेतस्थळ सुरू झाले आहे.मी प्रत्येक जिल्ह्याला जाहीरात देण्यास सांगितले आहे.ही बेशिस्त असेल तर सरकारी नोकरीवर येऊ शकत नाही.तुम्ही कसे मुलांना शिकवणार?नोंदणी सुरू झाली आहे तर तुम्हाला काही वाटत नाही का?तुम्ही मला विचारायला कसे आलात?” असे दीपक केसरकर यांनी सदरील भावी शिक्षिकेला ठणकावले.
दीपक केसरकर पुढे म्हणाले की,“संकेतस्थळ चालू आहे.भरती सुरू झाली आहे तर श्रद्धा आणि सबुरी ठेवा.आजपर्यंत पाच वर्षात कुणी शिक्षक भरती केली का? मी केली आहे.मी माध्यमांशी संवाद साधतोय त्यात तुम्ही येता.मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच कडकही आहे.माझ्या दृष्टीने विद्यार्थी महत्वाचे आहेत.मी तीस हजार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.उद्या तुम्ही मुलांनाही ही बेशिस्त शिकवत असाल तर मला मान्य नाही कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच हवे आहेत असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.तसेच “माझे अधिकार म्हणजे सर्वस्व व विद्यार्थी म्हणजे काहीच नाही हे मला चालणार नाही.राज्यातील विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भवितव्य आहे.ती मुले चांगली शिकली तर महाराष्ट्र घडणार आहे.अजिबात मध्ये बोलायचे नाही अन्यथा तुमचे नाव घेऊन अपात्र करायला लावेल अशी तंबीही दीपक केसरकरांनी महिलेला दिली आहे.