विदर्भ विभाग प्रमुख
दि.२७ नोव्हेंबर २३ सोमवार
मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमने-सामने आले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.दरम्यान हिंगोली येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रक्षोभक विधान केले असून ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा असे विधान तायवाडे यांनी केले यावर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून नेत्यांनी हातपाय कापण्यापर्यंत हा संघर्ष नेऊ नये.हातपाय कापणे सोपेच आहे त्याला ताकद लागत नाही.नेत्यांनी हातपाय जोडण्याचे काम केले पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.यावेळी त्यांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली.छगन भुजबळ हे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त नाही केली तर त्यांनी राजीनामा द्यावा असे खुले आव्हान बच्चू कडू यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिले आहे.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की,छगन भुजबळांनी इतके वर्षे राज्य केले त्यांनी कापण्यापेक्षा जोडता कसे येईल? याचा विचार केला पाहिजे. ओबीसी नेते तायवाडे त्यांनाही माझा इशारा आहे की,तुम्ही हातपाय कापा आम्ही जोडण्याचे काम करू.तुमची बुद्धी इतक्या खालच्या पातळीवर गेली असेल तर मी त्याचा निषेध करतो.तसेच तुम्ही तुमचे आरक्षण शांततेने मागावे.ओबीसीमध्ये मराठा घुसतोय असे काहीही नाही कारण कोकणातला,विदर्भातला मराठा कुणबी झाला पण चार-पाच जिल्ह्यातलाच मराठा कुणबी होत नाही त्यासाठीच गाजावाजा होत आहे हे सगळे राजकीय श्रेय घेण्याचे काम आहे.ज्यांचे काहीच राहिले नाही त्यांचे जातीच्या नावाने चांगभले आहे ते आता नळावरच्या भांडणासारखे भांडायला लागले याचे मला नवल वाटत आहे.मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी नियुक्त केलेली न्यायमूर्ती शिंदे यांची समिती बरखास्त करा या छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की,छगन भुजबळ म्हणजे सरकार नाहीत.भुजबळ हे कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे शिंदे समिती रद्द झाली नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा.एकतर ती समिती रद्द करा नाहीतर मग राजीनामा द्या.