गिरीश महाजन यांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचे काम करू नये-जरांगे-पाटील यांचा इशारा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ डिसेंबर २३ मंगळवार
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दोन वेळा उपोषण करून सरकारने दिलेल्या आश्वासानंतर जरांगे-पाटील यांनी २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे.अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडली असून या वक्तव्यानंतर जरांगे-पाटील यांनी गिरीश महाजन यांना सूचक इशारा दिला आहे.
सरसकट मराठा आरक्षणाची मागणी होत असून मी जरांगे-पाटील यांची चारवेळा भेट घेतली व तेव्हाही सांगितले आहे की,मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे शक्य नसून कुणबी दाखले सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहेत परंतु मराठा समाजाला सरसकट आरक्षण कुठल्या कायद्याखाली देणार? हा प्रश्न आहे.न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनीही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.यावर जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे की,गिरीश महाजन यांनी विचार करावा कारण मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्यासाठी आम्ही गिरीश महाजनांना ४ दिवसांचा वेळ दिला होता पण हा वेळ पुरेसा नसून १ महिन्यांची मुदत द्या,नोदींचा अहवाल करून कायदा तयार करतो असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.आता गिरीश महाजन यांनी वेगळी विधाने करून मराठा समाजाला नडण्याचे काम करू नये.गिरीश महाजन यांच्या सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे असून माध्यमांचे व्हिडीओही आहेत.पूर्ण राज्यात ते व्हायरल करू.‘संकटमोचक’ गिरीश महाजनांनी भरकटल्यासारखी वक्तव्ये करू नये.आमचा महाजन यांच्यावर विश्वास असल्याने तीनवेळा व्यासपीठावर मानसन्मान दिला आहे आता गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब करू नये असे जरांगे-पाटील यांनी नमूद केले आहे.