चोपड्यातून एक लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त;गुटखा तपासणी पथकाची मोठी कारवाई
चार दुकानांना सील करून चार आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.८ डिसेंबर २३ शुक्रवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांचे लेखी तक्रारीवरून चोपड्यात काल दि.७ डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैधरित्या गुटखा साठा शोधण्यासाठी टाकलेल्या धाडीत चार दुकान चालकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्या चौघांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले आहे.सदरील कारवाईमुळे गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून या कारवाईचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी शहरात गुटख्याची सर्रास विक्री होत असून त्यावर पायबंद घालण्यात यावा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.त्यानुसार अन्न व औषध प्रशासन जळगाव,धुळे व नाशिक येथील मिळून तीन वेगवेगळे पथक तयार करून चोपडा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.यात शहरातील दर्शन पान सेंटरचे किशोर चौधरी यांच्याकडून अवैधरित्या गुटखा विक्री करतांना १ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल,दयानंद अमरलाल सिंधी यांच्या गुरुकृपा प्रोव्हिजन यांच्याकडून ५१ हजार २०७ रुपयांचा मुद्देमाल,धनराज रूपचंद गेही यांच्या महादेव स्वीट यांच्याकडून ५५ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल,तर नवल झन्नालाल जैन यांच्या गोडावूनमधून ५८ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच या चौघे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आले असून त्यांचे गोडावून व दुकानांना सील करण्यात आले आहे.सदरील कारवाई नाशिक विभाग सहआयुक्त संजय बी.नारागुडे,नाशिक येथील सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे,जळगाव सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे,धुळे येथील अन्न सुरक्षा अधिकारी के.एच.बाविस्कर,जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी एस.एम.पवार,नंदुरबार येथील अन्न सुरक्षा अधिकारी बे.बी.पवार,नाशीक येथील अन्न सुरक्षा अधिकारी जी.व्हि.कासार,नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी यु.आर.सूर्यवंशी,वाय. आर.देशमुख आदी या पथकात सामील झाले होते.