Just another WordPress site

“भाजपाचे ढोंगी हिंदुत्व उघडे पडले असून “दूध का दूध और पानी का पानी” झाले आहे”-सामनातून ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार

पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल स्पष्ट झाला असून तेलंगणात काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यात आली तर इतर तीन राज्यात भाजपा आणि मिझोराममध्ये झोरम पिपल्स मुव्हमेंट या स्थानिक पक्षाने सत्ता स्थापन केली.या पाच राज्यांपैकी तेलंगणात काँग्रेसचा शपथविधीचा कार्यक्रमही झाला असून येथे रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे दरम्यान या शपथविधी कार्यक्रमात शपथ घेण्यास निवडून आलेल्या भाजपाच्या आठही आमदारांनी बहिष्कार घातला असून तेलंगणा विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हातून शपथ घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे यावरून ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे.

तेलंगणात मोदी-शहांच्या भाजपाची धूळधाण उडाली असून मध्य प्रदेश,राजस्थान वगैरे राज्यांत जे मोदी-शहा होते तेच तेलंगणात होते व ‘जमकर’ प्रचार करीत होते.योजनांच्या घोषणा व नेहमीचे तांडव करीत होते.मुसलमानांची मते काँग्रेसकडे जाऊ नयेत यासाठी ‘ओवेसी’ योजनाही अमलात आणली तरीही काँग्रेसचा विजय झाला अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.आता तेलंगणात भाजपाचे जे आठ आमदार निवडून आले आहेत त्यांनी असे ढोंग रचले आहे की,काही झाले तरी आम्ही विधानसभेत आमदारकीची शपथ घेणार नाही.तेलंगणाच्या विधानसभेत अकबरुद्दीन ओवेसी यांना नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून नेमण्यात आले.नियमानुसार सभागृहात जो सगळ्यात ज्येष्ठ सदस्य असतो त्यास शपथ सोहळ्यापुरते विधानसभा अध्यक्षपदी बसवून कामकाज पुढे नेले जाते त्यानुसार अकबरुद्दीन ओवेसी यांची नियुक्ती झाली.आता भाजप म्हणते आम्ही हिंदुत्ववादी असून ओवेसी यांच्याकडून शपथ घेणे आमच्या हिंदुत्वास बाधा आणू शकेल.भाजपाने यानिमित्ताने हिंदुत्वाचा बुरखा घेण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्या या नाटकानेच त्यांचा हा बुरखा फाडला.भाजपाचे ढोंगी हिंदुत्व उघडे पडले असून दूध का दूध और पानी का पानी झाले आहे कारण तेलंगणा विधानसभेत अकबरुद्दीन ओवैसी यांना प्रोटेम स्पीकर बनवण्याचा निर्णय तेलंगणाच्या राज्यपालांचा असून भाजपानेच नियुक्त केलेल्या राज्यपाल डॉ.तमिलीसाई सुंदरराजन यांच्या सही-शिक्क्याचे आदेश प्रसिद्ध झाले आहेत.सगळ्यात ज्येष्ठ विधानसभा सदस्य म्हणून राज्यपालांनीच घटना-नियमानुसार ओवेसी यांची नियुक्ती केली आहे यात भाजप नियुक्त राज्यपालांनी ओवैसी यांची नियुक्ती करायची आणि नंतर भाजपाच्याच नवनिर्वाचित आमदारांनी ओवैसींच्या नावाने बोंब ठोकत हिंदुत्वाचे ढोंग करायचे असा हा प्रकार आहे असाही हल्लाबोल करण्यात आला आहे.

मुळात तेलंगणातच नव्हे तर देशभरात ओवैसी यांचा ‘एआयएमआयएम’ पक्ष भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करतो हे आता उघड झाले आहे. ओवैसी यांचे राजकारण भाजपच्या नकली हिंदुत्वास पूरकच ठरत असते.देशात कुठेही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली की,मोदी-शहांच्या गुप्त अजेंड्यांचे चांदतारा घेऊन ओवेसी व त्यांचा पक्ष मैदानात उतरलेला दिसतो त्यामुळे ओवैसी यांच्याविषयी भाजपची भूमिका म्हणजे एकप्रकारची धूळफेक आहे अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.तेलंगणात ज्युनियर ओवेसी प्रोटेम स्पीकर झाले ते राज्यपाल टी.सुंदरराजन यांच्या आदेशाने त्यामुळे बहिष्काराची ही नौटंकी भाजप आमदारांनी राजभवनात जाऊन करायला हवी होती. राज्यपाल भाजपाचे,आदेश राज्यपालांचा पण भाजपाने गरळ ओकली ती प्रोटेम स्पीकर अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध.भारतीय जनता पक्षाचे हे वागणे आता आश्चर्यकारक राहिलेले नाही.ढोंग या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे भाजपा.भारतीय जनता पक्षाला अकबरुद्दीन ओवेसी हे चालत नसतील तर त्यांच्या पराभवासाठी भाजपने काय मेहनत घेतली? हैदराबादेत जाऊन पंतप्रधान मोदी यांनी काय केले? राजकारणात, निवडणुकांत ‘ओवेसी’छाप धर्मांध लोक असणे यावर भाजपाचे अस्तित्व टिकून आहे.जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नष्ट झाला व पाकिस्तानच्या उचापती बंद झाल्या तर भाजपावर बेरोजगारीचे संकट कोसळेल.कश्मिरी पंडितांचा आक्रोश,लडाखमध्ये घुसलेला चीन, मणिपुरातील हिंसाचारासारखे विषय भाजपाच्या हिंदुत्वात बसत नाहीत.या प्रश्नांना कोणी शंका उपस्थित केल्या तर,थांबा,लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर होत असून सर्व बेरोजगार तरुणांना रामलल्लांचे मोफत दर्शन घडवू असे सांगून धर्माच्या अफूची गोळी दिली जाते त्याच नशेत अंधभक्त निर्माण होतात व त्याच नशेत मतदान होते असेही त्यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात काही ‘बी टीम’ सध्या भाजपच्या मांडलिक बनून सत्तेत सहभागी झाल्या असून दिवस-रात्र मोदी-भाजपचे ‘नाम’ गात टाळ कुटत आहेत.काही पक्ष रिंगणाबाहेर राहून भाजपच्या सोयीची सुपारी ‘दिलसें’ वाजवत असतात पण हे सर्व खेळ महाराष्ट्रासाठी व देशासाठी घातक आहेत.सध्या देशात लोकशाहीची जागा हुकूमशाही घेत आहे. सामाजिक एकतेवर भाजपची मोडतोड तांबापितळ कंपनी मात करीत आहे.देशात पुन्हा दंगली पेटवल्या जातील व नकली हिंदुत्ववादाचे नाणे वाजवून भाजप पुन्हा सत्तेत बसेल ते रोखायला हवे.तेलंगणात प्रोटेम स्पीकरचा विरोध हे एक ढोंग आहे अशा रोजच्या ढोंगांना जनता कंटाळली आहे त्या ढोंगांना साथ देणारे पक्ष व पुढारी इतिहासाच्या पानावरून नष्ट होतील असेही ठाकरे गटाने सामनातून म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.