Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ डिसेंबर २३ मंगळवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथील उपोषणानंतर राज्यभरात लोकप्रिय झालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात त्यांनी जाहीर सभा घेण्याचा सपाटा लावला आहे.काल दि.११ डिसेंबर सोमवार रोजी लातूर जिल्ह्यातील माकनी आणि मुरुड येथे सभा घेतल्यानंतर ते बीड जिल्ह्यात अंबाजोगाई येथे सभा घेण्यासाठी आले होते.सभेदरम्यानच त्यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केले त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.अंबाजोगाई येथील सभेत बोलत असताना जरांगे पाटील म्हणाले, खूप उपोषण केल्यामुळे शरीर साथ देत नाही तरी यातून मी बरा होईल.बहुतेक सरकार त्याचे ऐकून आपल्यावर अन्याय करण्याच्या विचारत दिसत आहे. आपल्यावरील गुन्हे मागे घेऊ म्हणाले तेही घेतले नाहीत.मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या वेदना मांडत आहे.मला फक्त समाजासाठी आरक्षण हवे.माझ्या जिवात जीव असेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही हा शब्द आहे माझा.
मला डॉक्टरांनी दोन-तीन महिने आराम करण्यास सांगितले आहे.माझ्या किडनी आणि यकृताला सूज आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे पण विजयाचा क्षण जवळ आला असताना मी जर आता आराम केला तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होईल त्यामुळे जीवाची पर्वा न करता मी जागृती करण्यासाठी राज्यभर फिरत आहे.मागच्या दोन-तीन दिवसांत माझी प्रकृती ठिक नाही त्यामुळे मला अनेकांना भेटता येत नाहीये पण माझा जीव जरी धरणीला पडला तरी मी मराठा आरक्षण मिळवून देणारच असेही जरांगे पाटील म्हणाले.मराठा आरक्षणासाठी समाजाने एकजूट राहावे असा संदेश देत असतानाच मराठा समाजाने व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.ते म्हणाले सर्व समाजाने व्यसनांपासून दूर रहावे.एकिकडे आपले शेत साथ देत नाही.हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो.मुलही इतके शिकून त्यांना नोकऱ्या लागत नाहीत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू ठेवा आणि व्यसनांपासून दूर रहा हे केले तर आपली प्रगती कुणीच रोखू शकत नाही.अंबाजोगाईमधील थोरात रुग्णालयात जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत.सततचा प्रवास आणि दगदगीमुळे अशक्तपणा जाणवत असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.पीटीआय वृत्तसंस्थेला डॉ.थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्यांना बोलताही येत नव्हते.१७ दिवस उपोषण केल्यानंतर ते सतत फिरत आहेत त्यांची शुगर कमी झालेली आहे त्यांची परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे.आम्ही रक्त चाचण्या केल्या आहेत त्याचा अहवाल आल्यानंतर पुढची उपचाराची दिशा ठरविण्यात येईल पण आज दि.१२ डिसेंबर मंगळवार रोजी होणाऱ्या सभा घेण्याबाबत त्यांनी विचार करावा.