तुळजापुर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ डिसेंबर २३ बुधवार
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मौल्यवान दागिने लाटणारे उघड झाले असून जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांनी याप्रकरणी दोषी असलेले महंत,सेवेदारी आणि मंदिर संस्थानमधील अधिकारी व कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत विशेष म्हणजे यातील काही आरोपी मयत आहेत.तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात अनेक मौल्यवान दागदागिने आणि अलंकार आहेत.विविध राजे-महाराजे,संस्थानिक,मुघल बादशाह,निजाम,पोर्तुगीज,डच आदींनी देवीला मोठ्या भक्तीभावाने अर्पण केलेल्या प्राचीन अलंकारांची संख्याही मोठी आहे.भाविकांनी मागील १४ वर्षांत श्रद्धेपोटी देवीचरणी अर्पण केलेले वाहिक सोने २०७ किलो तर अडीच हजार किलो चांदी आहे.शिवकालीन दागिने,वेगवेगळ्या राजदरबारातील नाणी असा समृद्ध खजिना तुळजाभवानी देवीच्या मंदिरात होता त्यावरच मंदिरातील महंत,मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच काही सेवादार्यांनी डल्ला मारला असल्याचे जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी मंदिरातील सोने-चांदीचे दागिने व अलंकाराची तपासणी करण्यासाठी उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ जणांची समिती गठीत केली होती.या समितीने जुलै महिन्यात आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे त्यानुसार महंतांच्या ताब्यातील दागदागिने,सेवेदारी,अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अधिकार कक्षेत असलेले मौल्यवान प्राचीन अलंकार याची इनकॅमेरा तपासणी केली त्यात अनेक प्राचीन,दुर्मिळ आणि मौल्यवान अलंकार गहाळ असल्याचे समोर आले आहे तर काही अलंंकार नव्याने त्या ठिकाणी ठेवून शेकडो वर्षे जुना असलेला दागिना गायब करण्यात आला आहे.अहवालानुसार जबाबदारी निश्चित करून संबंधित दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी तुळजापूर पोलिसांना दिले आहेत.तुळजाभवानी देवीचा मुकूट गायब असल्याच्या तक्रारीनंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आणि दोनवेळा झालेल्या तपासणीत आढळून न आलेला ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट कोषागारातील पितळी पेटीत सापडला असल्याचा अहवाल घाईगडबडीत ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आला.यापूर्वी तपासणीत संशयास्पद म्हणून नोंद करण्यात आलेला ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट आणि ११ डिसेंबर रोजी पितळी पेटीत सापडल्याचा दावा करण्यात आलेला ८४६ ग्रॅम वजनाचा मूळ सोन्याचा मुकूट असे एक नव्हे,दोन मुकूट आता तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितले आहे.