“मंत्रीपद हा विषय मी माझ्या डोक्यातून कधीच काढून टाकला आहे”-मंत्रिमंडळ विस्तार चर्चेवरून बच्चू कडू यांचे विधान
महाराष्ट्र विधिमंडळाच्या मागील अधिवेशनानंतर राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे याबाबत विचारले असता प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून मंत्रीपद मिळाले तरी घेणार नाही. मंत्रीपदाच्या शपथीचा कागद फाडून टाकेन असे मोठे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल असे तुम्हाला वाटते का? असे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की,मी मंत्रिपदाचा दावाच नाकारला आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्ही भरत गोगावलेंना किंवा संजय शिरसाटांना विचारला पाहिजे.मी आता दावाच सोडला आहे तर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला कशाला विचारता?मंत्रीपद हा विषय मी माझ्या डोक्यातून कधीच काढून टाकला आहे.
बच्चू कडूंना कसल्याही मंत्रिपदाची गरजही नाही.‘हम अकेलेही काफी है,सब संभालने के लिए.’आता मंत्रीपद मिळाले तरी घेणार नाही. मंत्रिपदाच्या शपथपत्राचा कागद फाडून टाकेन आणि चार तुकडे करेन असे थेट वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.दरम्यान बच्चू कडूंनी विधानसभेत वंचित घटकांच्या बाजूने भूमिका मांडताना सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी चालकांना कामगार दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली असून सगळ्या वाहनांच्या चालकांना कामगार दर्जा देणे गरजेचे आहे. गावागावांमधल्या भूमीहीन मजुरांसाठी योजना आखायला हव्यात.शेतकऱ्यांप्रमाणेच या भूमीहीन मजुरांसाठीही योजना करायला हव्यात. देशभरात ११ हजार शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्या आहेत आपण यावर विचार करणे फार गरजेचे आहे असे बच्चू कडू म्हणाले.