Just another WordPress site

“प्रकाश आंबेडकरांची ताकद महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीबरोबर असावी याबाबत शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकमत”-संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २३ सोमवार
लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील व त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत असे विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना प्रतिक्रिया दिली आहे.संजय राऊत म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू असून प्रकाश आंबेडकर हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे नातू आहेत.देशात संविधान टिकावे व  लोकशाहीची हत्या होऊ नये,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही लोकशाही मार्गाने संपावी असे मत प्रकाश आंबेडकरांचे असून प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा होत आहेत.शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते लवकर एकत्र चर्चेसाठी बसणार आहोत असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
हुकूमशाहीचे हात बळकट होतील असा कोणताच निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत.शिवसेनेच्या बरोबरीने प्रकाश आंबेडकर पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाहीवर हल्ले करत आहेत.प्रकाश आंबेडकरांची हुकूमशाहीविरोधात भूमिका अत्यंत स्पष्ट आहे असे संजय राऊतांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती याआधीच झाली असून ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांबाबत उद्धव ठाकरेंनी मुद्दा मांडला होता.सोनिया गांधी आणि राहुल गांधींना वंचितला ‘इंडिया’ आघाडीत घेणे महत्वाचे असल्याचे पटवून दिले असून काँग्रेस आणि शरद पवारांचा प्रकाश आंबेडकरांना विरोध नाही.प्रकाश आंबेडकरांची ताकद महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीबरोबर असावी याबाबत शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे एकमत आहे असे संजय राऊत यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.