Just another WordPress site

“तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्याखालचा अंधार बघा ! देव,देश आणि धर्माची चिंता जनता करेल !!”-आशिष शेलार यांचे ठाकरे गटाला सडेतोड प्रतिउत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २३ सोमवार

 

महाराष्ट्र ‘धर्म’ हा मर्दाचा व स्वाभिमान्यांचा असून तुंबाजी आणि मंबाजीसारख्यांचा तो नाही.लढण्याआधीच या लोकांनी शस्त्रं ठेवली.जो लढलाच नाही त्याने विजयाचे हाकारे देऊ नयेत.लढून हरणाऱ्यांनाही या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे.मोगलांना आपल्या लेकी,सुना देऊन स्वतःची मुंडकी आणि पदे वाचवणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही.मिंध्यांनी मोगलांची हीच नीती वापरली पण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मंबाजी,तुंबाजींनी लक्षात ठेवावे असे म्हणत शिवसेनेने (ठाकरे गट) ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.दरम्यान ठाकरे गटाच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीने प्रत्युत्तर दिले असून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवले आहे त्यामुळे आपले ‘कुटुंब’ सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत.गांजा,चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत.मंबाजी-तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत… पत्रकार पोपटलाल यापैकी एकाची किंवा प्रसंगी दोघांची भूमिका चोख बजावत आहेत तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्याखालचा अंधार बघा.देव,देश आणि धर्माची चिंता जनता करेल! अजूनही सांगतोय,भोंदूगिरी सोडा आणि जय श्रीराम म्हणा तरच वाचाल, नाहीतर शिल्लक राहिले तेसुद्धा संपून जाल !

आम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका सोडलेली नाही.शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.राष्ट्रवादी (अजित) कमळावर नव्हे तर घड्याळावर लढणार असल्याचेही अजित पवारांनी जाहीर केले.धर्मनिरपेक्षतेसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असा दणकाही अजित पवारांनी उडवला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वैचारिक गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे ते असे.भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी त्यांच्याबरोबरचा शिंदे गट हा बोगस हिंदुत्ववादी अशा दोघांच्या कात्रीत अजित पवारांचा धर्मनिरपेक्षवादी गट अडकला आहे असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.ठाकरे गटाने म्हटले आहे की,शिंदे गटाने आणि अजित पवार गटाने कोणत्या चिन्हावर लढायचे हे दिल्लीतील भाजपा हायकमांड ठरवणार आहे. मुळात कलंकित चेहऱ्यांना,‘मिरची’छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये असे फर्मान सुटले तर शिंदे आणि अजित पवार गटातील ९० टक्के लोक बाद होतील.स्वत: अजित पवार हे कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत कारण भाजपा आणि त्यांच्याबरोबर दोन्ही गटांत आतापासूनच धुसफूस सुरू झाली आहे की कलंकित लोकाना उमेदवाऱ्या मिळू नयेत.उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. भाजपाच्या प्रमुख मंडळींची हीच भूमिका आहे असे वृत्त संघ परिवारानेच सोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.