“जागा वाटपात वंचित आघाडीला सामावून घेता येऊ शकते”-माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे स्तुतोवाच
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल समोर येताच देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरीही सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे तसेच आगामी लोकसभा निवडणूक ही एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी रंगणार आहे त्यामुळे या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा मोठा तिढा आहे.अनेक पक्ष एकत्र आल्याने राज्या-राज्यांत जागा वाटप करतांना सर्वच पक्षांना काही जागांचा त्याग करावा लागणार आहे तसेच मतविभाजन टाळण्यासाठी स्थानिक पक्षांनाही हाताशी घ्यावे लागणार आहे.वंचित बहुजन आघाडीही इंडिया आघाडीत सामिल होण्यास इच्छुक आहे परंतु काँग्रेसबरोबर असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे हे गणित जुळत नसल्याचे दिसत आहे परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.जागा वाटप विसरून सगळ्यांनी मोदींविरोधात एकत्र यायला हवे असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी नागपुरात आवाहन केले.त्यांच्या या आवाहनामुळे तेही इंडिया आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.वंचितने महाराष्ट्रात ठाकरे गटाबरोबर सख्य जमवले असले तरीही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत त्यांना अधिकृत स्थान मिळालेले नाही याबाबत चर्चा होणार असल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलतांना सांगितले आहे.
आघाडीसंदर्भातील निर्णय घेण्याकरता काँग्रसेने समिती स्थापन केली असून या समितीत सर्व राज्यनिहाय आघाडी अपेक्षित आहे त्यावर २९ डिसेंबरपासून चर्चा होणार आहे.आमची सकारात्मक भूमिका आहे.माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की वंचितने प्रतिसाद दिला तर त्यांनाही आघाडीत घेतले पाहिजे.प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात मतांचे विभाजन टाळता येईल.भाजपाविरोधात सक्षम पर्याय महाविकास आघाडी,प्रकाश आंबेडकर आणि इतर समविचारी पक्ष ठरू शकतो त्यामुळे जागा वाटपात त्यांना (वंचितला) सामावून घेता येऊ शकते असे माझे मत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले.काँग्रेस अखिल भारतीय समितीची २९ डिसेंबरला जागा वाटसंदर्भात बैठक होईल.या बैठकीत जागा वाटपासंदर्भात धोरण ठरवले जाईल.ही पक्षनिहाय बैठक असेल.प्रत्येक पक्षाला चर्चेसाठी बोलावून त्यांची मते लक्षात घेऊन अंतिम स्वरुप करता येईल असेही अशोक चव्हाण म्हणाले.