मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.याच दरम्यान महाराष्ट्रात ‘दसरा मेळाव्या’बाबतची चर्चा सुरु आहे.यानिमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे हे शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गाणार असल्याबाबतची एक महत्वाची माहिती समोर आली आहे.त्यामुळे शिवतीर्थावर गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील गाणं दुमदुमणार हे नक्की झाले आहे.मीडिया रिपोर्टनुसार आनंद शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच भेट झाली.या भेटीदरम्यान या गायनाबाबत निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे यांच्या भेटीनंतर अशी चर्चा सुरू झाली आहे की दसरा मेळाव्यामध्ये आनंद शिंदेंचा आवाज ऐकायला मिळेल.ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा वाद सध्या रंगला आहे.दोन्ही गटातील नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीसही सुरुवात केली आहे.पण आता शिवसेनेचा ठाकरे गट नवीन गाणेही घेऊन येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.आगामी निवडणुका आणि दसरा मेळावा या दृष्टीने हे वैचारिक गीत महत्त्वाचे ठरणार आहे.
दसरा मेळाव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडतोय की दोन दसरा मेळावे होणार आहेत.शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच स्वतंत्रपणे आणि अभूतपूर्व असे हे दोन मेळावे होणार आहेत.शिवसेना नेत्यांच्या बंडानंतरचा आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे.शिवसेना नेमकी कुणाची याचा निकाल निवडणूक आयोगाच्या दरबारात लागेल,पण त्याआधी दसरा मेळाव्याद्वारे दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन केले जाईल.याकरिता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.दादरमधील शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा तर शिंदे यांचा दुसरा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे.