“केंद्रात सत्ता आल्यापासून मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे”-राहुल गांधी यांचे टीकास्र
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार
देशातील सर्व समाज घटकांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून जातीनिहाय जनगणना करण्याची आमची मागणी असून या मागणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले व्यक्तव्य बदलले आहे.आधी ते स्वत:ला ओबीसी म्हणवून घेत होते आता मात्र देशात केवळ गरीब हीच एकमेव जात असल्याचे ते सांगतात.देशात गरीब ही एकच जात असेल तर मोदी ओबीसी कसे ?असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल दि.२८ डिसेंबर गुरुवार रोजी केला आहे.काँग्रेस पक्षाच्या १३९व्या स्थापना दिनानिमित्ताने काल गुरुवार रोजी नागपुरात दिघोरी नाक्याजवळील मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत राहुल गांधी बोलत होते.ते म्हणाले की ओबीसी,दलित,आदिवासींना सत्तेत,प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे.सर्वच क्षेत्रांत या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते.काँग्रेस पक्षाने जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली आणि आता ते स्वत:ला ओबीसीऐवजी देशात गरीब ही एकच जात असल्याचे सांगत आहेत.केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करण्यात येईल अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली आहे.
भाजप सरकारने देशातील कोटयवधी लोकांना गरिबीत लोटले असा आरोप राहुल यांनी केला असून आम्हाला अब्जाधीश आणि गरीब असे दोन भारत नको आहेत.देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. सर्वांच्या मदतीने महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तन घडवू असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.देशात विचारधारांची लढाई सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत परंतु देशात काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा दोन विचारधारा असून त्यांच्यातील ही लढाई आहे.काँग्रेसने देशाला राज्यघटना दिली त्यातून सर्वांना समान मताधिकार दिला मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्व गोष्टींनाच विरोध आहे.संघाने तर अनेक वर्षे आपल्या राष्ट्रध्वजाला वंदनही केले नव्हते अशी टीकाही राहुल गांधी यांनी यावेळी केली.देशात श्वेतक्रांती महिलांनी केली तर हरीत क्रांती देशातील शेतकऱ्यांनी केली.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती युवकांनी केली.काँग्रेसने त्यांना मदत केली असे नमूद करून राहुल गांधी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत किती लोकांना रोजगार दिले? ४० वर्षांत जेवढी बेरोजगारी नव्हती तेवढी आज निर्माण झाली आहे.देशातील युवकांना रोजगार नसल्यामुळे ते दिवसाचे सात-आठ तास समाजमाध्यमावर असतात त्यामुळे देशातील युवाशक्ती व्यर्थ जात आहे.दुसरीकडे निवडक दोन-तीन उद्योगपतींकडे देशाची संपत्ती सोपवली जात असून केंद्रात सत्ता आल्यापासून मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे.यातून प्रसार माध्यमे,निवडणूक आयोग,न्यायालयेही सुटली नाहीत असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले आहे.