Just another WordPress site

“निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे हे या लोकशाहीचे दुर्दैव”-संजय राऊत यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी शिर्डी येथील शिबिरात देशाला पुढे नेण्यासाठी नेहरूंच्या विचारधारेची आवश्यकता आहे असे भाष्य केले होते यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले असून हा देश ५००० वर्ष मागे घेऊन जाण्याच कुणी प्रयत्न करत असेल तर हा देश राहणार नाही त्याठिकाणी जंगल कायदा सुरू होईल असेही संजय राऊत म्हणाले तसेच सर्वोच्च न्यायालयाने हिडेंनबर्ग प्रकरणावर दिलेला निकाल त्यानंतर गौतम अदाणी यांची ‘सत्यमेव जयते’ ही प्रतिक्रिया आणि इंडिया आघाडीतील जागावाटप याबाबतही संजय राऊत यांनी आपल्या भूमिका मांडल्या.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,निवडणूक आयोग या घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्ष पाठिंबा देत आहे हे या लोकशाहीचे दुर्दैव आहे.या देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदाणीचा विजय होतो. हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारचा निकाल दिला त्यावर आम्हाला कोणतीही टिप्पणी करायची नाही कारण आजतरी आपल्याकडे न्यायालयाचा निकाल हा खाली मान घालून मान्य करण्याची प्रथा आहे.या निकालानंतर अदाणी म्हणाले सत्याचा विजय झाला.ज्या प्रकरणात संसद चालली नाही लोक रस्त्यावर उतरली,सत्य बाहेर आले नाही उलट त्यांना क्लीनचीट मिळाली मग हे सत्य इतरांच्या बाबतीत कुठल्या बिळात लपवले जाते?महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील जनता न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊन देखील विधिमंडळाचे अध्यक्ष निर्णय घ्यायला तयार नाही अशा वेळेला जो न्याय अदाणी यांना मिळतो तो न्याय या देशातील नागरिकांना का मिळत नाही? हा आमच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

अदाणी समूहाचे गौतम अदाणी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच संजय राऊत म्हणाले की,या देशातील १३८ कोटी जनता आजही संघर्ष करत आहे व मूठभर लोकांकडेच पैसे आहेत.१०० उद्योगपतींची २६ लाख कोटींची कर्ज माफ होतात दुसरीकडे शेतकऱ्यांची दोन-पाच हजाराचे कर्ज माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो.अदाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे ती देशाची श्रीमंती आहे असे आम्ही मानत नाही.धारावी,वरळी मीठागृहे,देशातील बंदरे आणि सार्वजनिक मालमत्ता एकाच उद्योगपतीला दिल्यानंतर तो श्रीमंत होणारच अशी टीका संजय राऊत यांनी केली.शरद पवार यांनी नेहरूंच्या विचारधारेबाबत केलेले वक्तव्य सत्य असून हा देश ५००० वर्ष मागे घेऊन जाण्याच कुणी प्रयत्न करत असेल तर हा देश राहणार नाही त्याठिकाणी जंगल कायदा सुरू होईल असेही संजय राऊत म्हणाले.पंडित नेहरू यांच्यापासून पुढली ५० वर्ष या देशामध्ये ज्ञान विज्ञान शिक्षण अंतराळामध्ये प्रचंड प्रगती केली.उद्योग क्षेत्रात आम्ही झेप घेतली त्याला कारण होते की त्यांनी या देशाला आधुनिकतेचा मार्ग दाखवला,विज्ञानाचा मार्ग दाखवला.संशोधनासाठी त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या पण आत्ताचे जे काही राज्यकर्ते आहेत ते या देशाला पाच हजार वर्ष मागे घेवून जात आहेत त्यामुळेच देशात दहा वर्षापासून बेरोजगारी वाढत आहे,शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत,महागाई वाढत आहे यावर सरकारकडे एकच उपाय आहे तो म्हणजे धर्म.पण धर्माच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही आणि लोकशाही टिकू शकत नाही असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.