मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आणखी टोकदार होत असल्याचे चित्र आहे.या मेळाव्याच्या आधीच दोन्ही गटांकडून जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.दोन्ही बाजूंनी दररोज नवनवे टीझर प्रदर्शित करत एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत.अशातच बंडखोर आमदारांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून पुढील रणनीतीही आखण्यात आली आहे.दसऱ्याला शिवाजी पार्कवर मेळावा पार पडताच उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओखळल्या जाणाऱ्या ठाणे शहरात जाहीर सभा घेणार आहेत.ठाण्यातील टेंभी नाका येथे ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होईल.या सभेसोबतच राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेला सुरुवात होणार आहेत.महाप्रबोधन यात्रेदरम्यान उद्धव ठाकरे हे राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये सभा घेण्याची शक्यता आहे.महाप्रबोधन यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे.महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची ‘महाप्रबोधन यात्रा’ जाणार आहे.मुख्यमंत्रिपदावर असताना राज्यासाठी कोणकोणती कामे केली तसेच कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने कशी काम केली त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडापर्यंत उद्धव ठाकरे आपली भूमिका जनतेसमोर ठेवतील.दरम्यान शिवसेना नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला राज्यभरात मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर उद्धव ठाकरे हेदेखील आता मैदानात उतरले आहेत.त्यामुळे बंडखोरांविरोधात रान पेटवण्यात उद्धव ठाकरे यांना यश येते का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असणार आहे.