“सध्या देशात हुकुमशाही पद्धतीने काम चालू असून देश संकटात !!”-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा गर्भित इशारा
संगमनेर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जानेवारी २४ सोमवार
केंद्रातील भाजपा सरकारमुळे घटना आणि लोकशाही धोक्यात आली असून हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला आहे व त्यामुळे देश देशोधडीला लागेल.मोदींच्या हाती पुन्हा सत्ता दिली तर लोकशाही धोक्यात येईल असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला.माजी केंद्रीय मंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते दिवंगत अण्णासाहेब शिंदे आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने काल दि.७ जानेवारी रविवार रोजी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरमध्ये बोलत होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी सिद्धरामय्या म्हणाले की,पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्यांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आत्ताचे सत्ताधारी कुठेही नव्हते.या देशातील जनतेला मुबलक अन्न मिळते यामागे स्वातंत्र्यापासून काँग्रेसने केलेले रचनात्मक काम आहे.सध्या देशात हुकुमशाही पद्धतीने काम चालू असून देश संकटात आहे म्हणून आता जनतेने जागृत झाले पाहिजे.सहकार चळवळ ही जनतेच्या मालकीची आहे.जनता या चळवळीची चालक आहे त्यात केंद्राचा हस्तक्षेप कायद्याविरोधी आहे.केंद्र सरकारने राज्यातल्या सहकारात ढवळाढवळ करणे हे घटनाविरोधी आहे.या विरोधात आपण लढून हे अतिक्रमण हाणून पाडले पाहिजे.भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या इथल्या सहकारी संस्था माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत.इथल्या सहकाराचे यशस्वी जाळे,इथला हिरवागार समृद्ध परिसर पाहून आपण भारावून गेलो असल्याचे सिद्धरामय्या यांनी यावेळी म्हटले आहे.