मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ जानेवारी २४ सोमवार
देशासाठी तसेच लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत.केजरीवाल,सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाहीविरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झाले तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवला आहे.ईव्ही एमविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत व ‘ईडी’ची डोकी फुटली आहेत तरीही जनता लढायला तयार आहे.संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो तेव्हा हुकूमशहांना देशातून पळून जावे लागते असे जगाचा इतिहास सांगतो.इतिहासाची पुनरावृत्ती होतांना दिसत आहे.भजन रामाचे व कृती रावणाची ही भूमिका चालणार नाही ! असे सामना अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
सामना अग्रलेखात पुढे नमूद करण्यात आले आहे की,सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी-शहांच्या सरकारला सुबुद्धी देतील असे वाटले होते पण ‘आडात नाही,तर पोहऱ्यात कोठून येणार?’ या उक्ती प्रमाणे सध्या या सरकारचा कारभार चालला आहे.भजन रामाचे व कृती रावणाची हेच मोदी-शहा सरकारचे उद्योग सुरू आहेत.विरोधकांना नामोहरम करायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग.रावण आणि कंसमामाने त्यांच्या विरोधकांना म्हणजे देव मंडळास बंदी बनवले होते तरीही शेवटी या दोन्ही राक्षसांचा पराभव झालाच.आपल्या देशातही शेवटी राम-कृष्णाचाच विजय झाला त्यामुळे कलियुगात ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्सटॅक्स,पोलीस बळाचा वापर केला तरी जय सत्याचा होईल.रोहित पवार यांच्या कंपन्यांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले.रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आहेत व भाजपच्या चोरबाजारात सामील होण्याचे त्यांनी टाळले,दबाव मानला नाही.अलीकडेच त्यांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली.लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला.अजित पवार वगैरे लोकांनी घेतलेल्या डरपोक भूमिकेविरुद्ध ते परखडपणे बोलत आहेत त्यामुळे ‘ईडी’चे संकट त्यांच्यावर कोसळणारच होते ते शेवटी कोसळलेच.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची प्रतिक्रिया मनोरंजक व राजकीय विश्लेषकांनी अभ्यास करावी अशी आहे.श्री.फडणवीस म्हणतात,‘‘रोहित पवारांवर छापा पडला की नाही हे माहीत नाही मात्र पवार हे व्यावसायिक असून व्यवसायात असे प्रकार होत असतात त्यांनी काहीच केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.’’ फडणवीस यांचा हा खुलासा म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना आहे.
अजित पवार,हसन मुश्रीफ,प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी व्यवसायात आहेत व त्यांच्या व्यवसायाचे रहस्य ईडीनेच उघड केले.ईडीने त्यांचे नरडे आवळताच या लोकांनी बेडकाप्रमाणे उडय़ा मारून भाजपचा आश्रय घेतला.श्री.फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे या मंडळींनी काहीच केले नव्हते तर त्यांनाही घाबरण्याचे कारण नव्हते पण त्यांना घाबरवले त्यांच्या घरादारांवर ईडीने छापे मारले व शेवटी या सगळय़ांनी भाजपच्या गटार गंगेत उडय़ा मारताच ते पवित्र झाले.आता छापे वगैरे बंद झाले.सिंचसिंन घोटाळा,शिखर बँक घोटाळा,जरंडेश्वर कारखाना व्यवहार, मिरची घोटाळा,मुश्रीफांचा बँक,साखर घोटाळा याबाबत श्रीमान फडणवीस यांना काहीच माहीत नाही ? त्यांच्या व्यवहारात घोटाळेच घोटाळे
होते पण भाजपने त्यांचे शुद्धीकरण केले आहे असे शुद्धीकरण सध्या रोज सुरू आहे व त्यांचे पौरोहित्य ‘ईडी ’ वगैरे लोक करीत आहेत.याच ‘ईडी’ पथकावर बंगालात संतप्त जमावाने भयंकर हल्ला केला व त्यांना डोकी फुटेपर्यंत मारले.रेशन घोटाळय़ाच्या नावाखाली ‘ईडी’चे पथक एका गावात गेले व जनतेशी हुज्जत घालू लागले तेव्हा जनता खवळली व ईडी पथकास रक्तबंबाळ होईपर्यंत चोप दिला.या घटनेचे समर्थन कोणीच करणार नाही.केंद्रीय पथकावर असे हल्ले होणे योग्य नाही पण ही वेळ का आली ? कोणामुळे आली ? प.बंगालात तृणमूलच्या नेत्यांना ईडी त्रास देत आहे हे राजकीय सुडाचे खेळ आहेत.भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी हे बंगालात विरोधी पक्षनेते आहेत.प.बंगालातील ईडी हल्ल्यामागे त्यांनी ममता बॅनर्जी यांना दोषी धरले.प.बंगालात सरकार बरखास्तीची मागणी ते करतात पण त्याच सुवेंदू महाशयांवर भ्रष्टाचाराचे
गंभीर आरोप आहेत.ईडीची कारवाई त्यांच्यावरही सुरू होती पण ऐन वक्तास हे महाशय भाजपवासी झाले व त्यांच्यावरील आरोपाचे डाग धुऊन निघाले.आता ते ईडीचे समर्थक व भक्त बनले आहेत आणि तृणमूलच्या मंत्र्यांना ‘लक्ष्य’ केले जात आहे.हेच चित्र देशभरात आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामागे ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ लावून त्यांच्या डोक्यावर अटकेची तलवार टांगत ठेवली गेली आहे.‘इंडिया ’आघाडीतून बाहेर पडा नाही तर ‘ईडी ’ तुरुंगात टाकेल अशा सरळ धमक्या दिल्या आहेत.सत्येंद्र
जैन,मनीष सिसोदिया या दिल्लीच्या दोन मंत्र्यांना अटक झाली.अदानीं विरुद्ध आवाज उठविणारे आपचे खासदार संजय सिंह यांनाही पकडले. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्वही त्यांच्या अदानीं विरोधातील भूमिकेमुळेच निलंबित केले गेले.लोकसभा निवडणुकीपूर्वी हे अटकसत्र जास्त जोर पकडेल.तामीळनाडूतही ईडीने मंत्र्यांवर हात टाकला.महाराष्ट्रात हा खेळ निरंतर सुरूच आहे.या सगळय़ामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे व ईडी-सीबीआयचे महत्त्व कमी झाले आहे.अर्थात ईडीने धमक्या दिल्या तरी आता लोक घाबरणार नाहीत.देशासाठी,लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत.केजरीवाल,सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाही विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.महाराष्ट्रात रोहित पवार यांनीही काही झाले तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवला आहे.प.बंगालात लोकांनी ‘ईडी’ला चोप दिला आहे ही एक प्रकारे अराजकाची ठिणगी आहे.प.बंगालात ‘ईडी’ची डोकी फुटली हे चांगले नाही पण हे लोण देशात पसरू नये.‘ईडी’त्यांच्या मालकांचे आदेश पाळते पण लवकरच मालक बदलणार आहेत त्यामुळे हे मालक व त्यांचे चुकीचे आदेश पाळणारे ‘ईडी’ वगैरेंना ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागेल याचे भान त्यांनी ठेवायला हवे.‘ईव्हीएम’ घोटाळा उघड झाला आहे,ईव्हीएम विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत व ‘ईडी’ची डोकी फुटली आहेत तरीही जनता लढायला तयार आहे.संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो तेव्हा हुकूमशहांना देशातून पळून जावे लागते असे जगाचा इतिहास सांगतो.इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.भजन रामाचे व कृती रावणाची ही भूमिका चालणार नाही ! अशी सामना अग्रलेखातून खरमरीत टीका करण्यात आली आहे.