पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पुणे विभागातील वाल्हा ते नीरा दरम्यान दुहेरी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ६, १६, १७ आणि २० ऑक्टोबर रोजी मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस व पुणे-सातारा-पुणे डेमू रद्द करण्यात आली आहे.पुणे-फलटण-पुणे ही रेल्वे गाडी ४ ते २३ ऑक्टोबर दरम्यान लोणंद-फलटण- लोणंद दरम्यान रद्द करण्यात आली आहे.तर याच काळात पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस ही कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर दरम्यान चालणार आहे.२०ऑक्टोबर रोजी सुटणारी कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही सायंकाळी ७ वाजता सुटेल.तसेच २० ऑक्टोबर रोजी यशवंतपूरवरून सुटणारी यशवंतपूर चंदीगड एक्सप्रेस व हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्सप्रेस मिरज,कुर्डूवाडी,दौंड या मार्गावरून जातील.दरम्यान ४ ते २३ ऑक्टोबर हुबळी दादर एक्स्प्रेस ही देखील मिरज, कुर्डूवाडी,दौंड या मार्गे धावेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दिवाळी काही दिवसांवर आल्यामुळे नागरिकांकडून सुट्टीचे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे.पण पुण्यातून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याचे बुकिंग ‘फुल’ झाल्यामुळे गावी कसे जायचे?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.रेल्वे बोर्डाकडे पुण्यातून राज्याच्या विविध भागांत दिवाळीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.पुणे शहर व परिसरात नोकरीनिमित्ताने राज्यातील विविध भागांतील नागरिक आले आहेत.तसेच पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’, ‘आयटी हब’ म्हणूनदेखील ओळखले जाते त्यामुळे पुण्यात राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे.हे विद्यार्थी दिवाळीत १० ते १५ दिवस सुट्टी घेऊन गावी जात असतात.त्यामुळे पुणे येथून सुट्टीच्या कालावधीत विदर्भ,मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.परिणामी ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांना फार मोठा मनःस्ताप सहन करावा लागणार आहे.