“कुंभारी गावात पारधी वसाहतीवर स्थानिक गावक-यांचा सशस्त्र हल्ला”
४० घरांवर दगडफेक; महिला आणि अल्पवयीन मुलींना बेअब्रू करीत महिलांच्या अंगावरील सोने लुटले
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ फेब्रुवारी २४ शुक्रवार
सोलापूर शहराला खेटून असलेल्या कुंभारी ता.दक्षिण सोलापूर गावात पारधी वसाहतीवर स्थानिक गावक-यांनी सशस्त्र हल्ला करून ३० ते ४० घरांवर दगडफेक केली यात महिला आणि अल्पवयीन मुलींची बेअब्रू करण्यात आली.महिलांच्या अंगावरील सोन्याचे किडूक मिडूक दागिनेही लुटण्यात आले.या हल्ल्यात एका तरूणासह सात पारधी महिला जबर जखमी झाल्या आहेत.या घटनेमुळे पारधी वसाहतीवर दशहतीची छाया पसरली आहे.
दरम्यान हल्लेखोरांविरूध्द वळसंग पोलीस ठाण्यात बाललैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम,विनयभंग,अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रबंधक कायदा,लुटमार,गर्दी व हाणामारी आदी कायद्याच्या विविध २१ कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब बिराजदार व त्यांचा मुलगा रोहित बिराजदार,तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सागर तेली,शिवानंद आंदोडगी,जी.जी.पाटील,कल्लू छपेकर,संतोष कुदरे,नागेश कुदरे,श्रीशैल माळी,लिंगराज ख्याडे,धानय्या छपेकर,आप्पा छपेकर,चंदू रेड्डी आदी तेरा जणांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत.सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी परिसरात जेथे गेल्या १९ जानेवारी रोजी तब्बल ३० हजार असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५ हजार घरांच्या चाव्या देण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते त्याच कुंभारी शिवारात पारधी वस्तीवर काल बुधवारी रात्री सशस्त्र हल्ला झाल्याचे हे गाव बदनामीच्या फे-यात सापडले आहे.
कुंभारी गावाजवळ अनेक वर्षांपासून पारधी वसाहत अस्तित्वात आहे त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिले जाते.रात्री आप्पासाहेब बिराजदार व इतरांनी पारधी वसाहतीत येऊन एका घरावर हल्ला केला त्यावेळी एका महिलेसह तिच्या दोन मुलींना मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला गेला व अन्य एका १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचीही बेअब्रू करण्यात आली.तेथे हल्ला थांबविण्यासाठी धावून आलेल्या अन्य महिलांना काठ्या,लोखंडी सळई,पाईप आणि दगडांनी मारहाण करण्यात आली.एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने काढून घेण्यात आले.पारध्यांनो तुम्हांला चोरीचा पैसा जमवून मस्ती आली आहे अशा शब्दांत जातीवाचक शिवीगाळीसह धमक्या देऊन हल्ला केला गेल्याचे एका पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.