“महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल”,मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर शरद पवारांची खोचक टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ फेब्रुवारी २४ शनिवार
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी दि.२ फेब्रुवारी रात्री भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही आज पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले.उल्हासनगर गोळीबार सारख्या प्रकरणावरून सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका त्यांनी केली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही खोचक टीका केली.शरद पवार म्हणाले की,सत्तेचा गैरवापर केला जातो अशी तक्रार नेहमी होत असते.गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे हे कळते.महाराष्ट्राच्यादृष्टीने अशा घटना चिंताजनक आहेत.लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत ही चांगली बाब आहे,महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत आहे असे दिसते.माझी मागणी आहे की,गुजरातला ते गेल्यानंतर काहीतरी देण्याबाबतचे औदार्य दाखवतात तसे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर केली.
महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होत आहेत यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले,मविआच्या बैठकीबाबत माझ्या सहकाऱ्यांनी मला माहिती दिली.अतिशय चांगली चर्चा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यासाठी जो आग्रह केला तो अतिशय योग्य आहे.केवळ पक्ष एकत्र येऊन चालणार नाही तर काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल.निवडणुकीत जागा जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी जागा कशासाठी जिंकायच्या,कोणत्या कार्यक्रमावर त्या जिंकायच्या यावर चर्चा झाली नाही तर नंतर मतभेद होतात.मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे व ही योग्य आहे असे मला वाटते.इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले आहेत यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की,नितीश कुमार यांनी एनडीएत जायचा निर्णय घेतला पण खरे सांगायचे तर इंडिया आघाडीची स्थापना करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला होता पण त्यांनी अचानक टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल काही सांगू शकत नाही पण जे घडले ते चांगले नाही झाले पण बिहारमधील जनतेला त्यांचा हा निर्णय रुचलेला नाही. याचे परिणाम बिहारच्या निवडणुकीत दिसतील.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे याबद्दल बोलताना ते म्हणाले की,आदिवासीबहुल असलेल्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते.आदिवासी नेत्याबद्दल दिल्लीमधील प्रशासन अशी भावना ठेवत असेल तर ते योग्य नाही.सोरेन यांनी झारखंडमध्ये जी धोरणे राबविली ते पाहण्यासाठी दिल्ली आणि देशाबाहेरील जाणकार प्रशासकही येतात असे असताना सोरेन यांच्या सहकाऱ्यांना अटक करून आत टाकले हे काही योग्य नाही.सत्तेच्या गैरवापराला आज काही मर्यादा राहिली नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.