निवडणूक आयोग खरोखर स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला प्रश्न
निवडणूक आयोगाने चोरांची चोरी वैध ठरवायला सुरुवात केली आहे-आदित्य ठाकरे यांची एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ फेब्रुवारी २४ बुधवार
गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फूटला त्यापाठोपाठ जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती.खरे पक्ष कोणते हे ठरवण्यासाठी चारही गटांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावले त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली त्याचबरोबर धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाने असाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घेतला आहे.आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा निर्णय मंगळवार दि.६ फेब्रुवारी रोजी जाहीर केला.या निकालाद्वारे आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे तसेच घड्याळ हे पक्षाचे अधिकृत चिन्हदेखील अजित पवार गटाला बहाल केले आहे त्याचबरोबर शरद पवार गटाला दुसरे नाव आणि चिन्ह निवडण्यास अवधी दिला आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,निवडणूक आयोगाने चोरांची चोरी वैध ठरवायला सुरुवात केली आहे अशा निर्णयांमुळे लोकशाही नष्ट होते तसेच निवडणूक आयोगाने पूर्णपणे तडजोड केलेली दिसतेय.आयोगाने पुन्हा एकदा लोकांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले आहे.देशात आता मुक्त आणि निष्पक्ष लोकशाही अस्तित्वात नाही ही गोष्ट आयोगाच्या निकालाने स्पष्ट केली आहे.यासह आदित्य यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की,निवडणूक आयोग खरोखर स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की,निवडणूक आयोगाने तडजोडी केल्या आहेत कारण ते तडजोड बहाद्दर आहेत.
याबाबत अजित पवार म्हणाले की,गेल्या वर्षी राज्यात राजकीय घडामोडी घडल्या यात कोणत्याही पक्षासंदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची परंपरा आहे त्याप्रकारे आम्ही निवडणूक आयोगाकडे न्याय मागितला तिथे आम्ही आमचे म्हणणे मांडले,इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले त्यावर अनेक तारखा पडल्या,सुनावण्या झाल्या सर्व वकिलांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर लोकशाहीत बहुमताला प्राधान्य दिले जाते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचा झेंडा या सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत.प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,धर्मराव बाबा आत्रम,आदिती तटकरे यांच्याह ५० आमदारांनी घेतलेल्या निर्णयावर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.हा निकाल मी विनम्रपणे स्वीकारतो तसेच निवडणूक आयोगाचेही आभार मानतो असे नमूद केले आहे.