मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ फेब्रुवारी २४ बुधवार
पक्ष फोडा आणि भ्रष्टाचार करा हीच सध्या मोदी गॅरंटी आहे.तुमचा पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्यात या मग आम्ही तुम्हाला पवित्र करु ही सध्याची मोदी गॅरंटी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर टोलेबाजी केली आहे.आजचा निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नाही.अमित शाह आणि मोदी यांच्या मालकीचा हा आयोग झाला आहे तसेच निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला असेही संजय राऊत म्हणाले.जे शिवसेनेबाबत झाले तेच शरद पवारांबाबत घडले.पक्षाचे संस्थापक बसले आहेत निवडणूक आयोगासमोर जाऊन,निवडणूक आयोगाने पक्ष दुसऱ्याच्या हातात सोपवला यालाच सध्या मोदी गॅरंटी म्हणतात.मोदी गॅरंटी कुठली असेल तर हीच की पक्ष फोडा,भ्रष्टाचार करा,आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर हल्ले करु,ईडी लावू,सीबीआय लावू त्यानंतर तुमचाच पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्याकडे या.आम्ही तुम्हाला पवित्र करु आणि आमच्याबरोबर घेऊ ही मोदी गॅरंटी.नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.अजित पवारांवर सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.आज काळाने त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे तोच पक्ष मोदी आणि शाह यांना अजित पवारांना दिला.निवडणूक आयोगाने हा पक्ष अजित पवारांना दिला. निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग नाही तर मोदी शाह यांचा निवडणूक आयोग आहे.मोदी आणि शाह यांना यांना महाराष्ट्राचा बदला घ्यायचा आहे म्हणून हे सगळे चालले आहे असे म्हणत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे १०० टक्के शुद्ध मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत.महाराष्ट्रात अन्याय झाला तर आवाज उठवणारे पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची वाताहात करुन भाजपाने दाखवून दिले की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला आहे मात्र या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही.जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातल्या जनतेचे धोरण आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचे काही म्हणणेच नाही.भाजपात त्यांनी शिरकाव केला हा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी पक्षांवर दावा सांगायचा आणि भाजपाने ते पक्ष त्यांच्या हातात सोपवायचे हा वादाचा मुद्दा आहे.तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा.हा माझा पक्ष आहे मला मत द्या असे मागा. चोऱ्यामाऱ्या करुन,दरोडेखोरी करुन तुम्हाला राजकारण करायचे असेल तर ते तात्पुरते आहे लक्षात ठेवा.एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे अभिनंदन लोक करत आहेत त्यांना पक्ष मिळाला म्हणून.मात्र लक्षात घ्या तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो.भाजपाला या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील.शिवसेनेच्या बाबतीत जे झाले तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडणार आहे.निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला त्यानंतर लोकशाहीची पूर्णपणे हत्या करण्यासाठी हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सोपवण्यात आले आहे असाही टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.