‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असे म्हटले तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या !!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर मनसेची प्रतिक्रिया
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ फेब्रुवारी २४ बुधवार
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी मोठा भूकंप झाला व जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती.पक्षातील काही आमदारांना आपल्याबरोबर घेत अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आणि या गटासह त्यांनी महायुतीत प्रवेश केला तसेच मूळ पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले.निवडणूक आयोगाने याप्रकरणी मंगळवार दि.६ फेब्रुवारी रोजी निकाल दिला.या निकालानुसार अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.यासह आयोगाने पक्षाचे चिन्हही अजित पवार गटाला बहाल केले आहे त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.