मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ फेब्रुवारी २४ बुधवार
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आज दि.७ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथे दाखल झाले असून कार्यकर्त्यांबरोबरच्या बैठका संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.यावेळी मनोज जरांगे म्हणाले,आतापर्यंत मराठा समाजातील लोकांच्या तब्बल ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत याद्वारे जवळपास दोन कोटी मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र मिळेल आणि त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाईल त्याचबरोबर सगेसोयऱ्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.दरम्यान यावेळी जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांना आवाहन केले आहे की,“शिकून मोठे व्हा,अधिकारी व्हा.” त्याचबरोबर जरांगे यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की,मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर शक्यतो शासकीय भरती करू नका करणारच असाल तर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून भरती प्रक्रिया सुरू करा जेणेकरून इतर समाजातील लोकांचे नुकसान होणार नाही.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला सांगितले,आधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा त्यानंतर निवडणुकीची आचारसंहिता लागू करा. आरक्षण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे त्यामुळे राज्यकर्ते निवडणूका घेणार नाहीत असे मला वाटतय.दरम्यान यावेळी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला की आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर सामाजिक खुर्चीवर बसणार की राजकीय खुर्चीत बसणार? त्यावर मनोज जरांगे म्हणाले माझ्यासाठी समाजाची खुर्ची बरी आहे.राजकीय खुर्ची मला नको.मनोज जरांगे पाटील म्हणाले,मी सामान्य घरातून आलो आहे त्यामुळे मला सामान्यांसाठी काम करायचे आहे.आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत मी कुठल्याही खुर्चीत बसणार नाही.अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर सामाजिक खुर्चीवर बसेन,मला राजकीय खुर्ची नको.आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर कोट्यवधी मराठ्यांच्या मुलांचे भले होणार आहे.समाजमाध्यमांवर मनोज जरांगे यांच्या विरोधात लिहिलेल्या काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत त्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.जरांगे पाटील म्हणाले,मी पूर्वी या गोष्टी मनावर घ्यायचो.मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे मला आधी कळत नव्हते पण आता काही फरक पडत नाही.काही लोकांना उद्योग नाही.मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही.त्यात छगन भुजबळांची माणसही असू शकतात.या लोकांना कोणीतरी सुपारी दिली असेल त्यामुळे विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.