“तुम्ही बेइमानी करून,भ्रष्टाचार करून भाजपाच्या गोटात या,आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात देतो,हीच ‘मोदी गॅरंटी’ “!!-सामना अग्रलेखातून टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.८ फेब्रुवारी २४ गुरुवार
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार’ असे नाव निश्चित केले आहे या सर्व प्रकरणावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत.विरोधकांकडून अजित पवारांचेच काही जुने व्हिडीओ पोस्ट करून त्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.ठाकरे गटाने या सर्व घडामोडींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह यांना लक्ष्य केले आहे तसेच शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना देण्यावरून टीका करणारे अजित पवार आता विनम्रपणे आयोगाचा निकाल कसे स्वीकारतात? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.तुम्ही बेइमानी करून,भ्रष्टाचार करून भाजपाच्या गोटात या,आम्ही तुमचा ‘पक्ष’ तुमच्या ताब्यात देतो,हीच ‘मोदी गॅरंटी’ आहे व लोकशाहीसाठी तो सगळ्यात मोठा धोका आहे. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे ‘नॅशनॅलिस्ट करप्ट पार्टी’ अशी टीका मोदी-शहांनी केली होती तीच तथाकथित ‘करप्ट’ पार्टी मोदी-शहांच्या गॅरंटीने आता अजित पवारांना सोपवली.अजित पवारांच्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब स्वतः पंतप्रधान मोदी यांनी फोडला होता त्याच अजित पवारांना ‘राष्ट्रवादी’ व घड्याळ चिन्ह मिळताच मोदी-शहा-फडणवीस-बावनकुळे वगैरे भाजप कुळांनी आनंद साजरा केला यापेक्षा ढोंग आणि वैचारिक व्यभिचार तो कोणता? असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
देशातल्या लोकशाहीचे हे दशावतार आहेत.निवडणूक आयोग,संसद,न्यायालये,ईव्हीएम असे सगळे काही एक-दोन व्यक्तींच्याच मुठीत असल्यावर ही मंडळी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागाच काय,१४८ जागा व देशात ७०० जागा सहज जिंकू शकतात असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत असा अतिविनम्र आविर्भाव अजित पवार यांनी आणला हे ढोंग आहे.शिवसेना मिंधेंच्या हाती सोपवली तेव्हा याच अजित पवारांनी जाहीरपणे सांगितले होते हे बरोबर नाही पक्ष ज्यांनी स्थापन केला त्यांच्याकडून काढून घेतला,चिन्ह काढून घेतले हे निवडणूक आयोगाने केले पण हे जनतेला पटले का?’ पण आज त्याच पद्धतीने अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला व जिंकला आता हे तरी लोकांना पटते का याचे उत्तर अजित पवार व त्यांच्या फुटीर मंडळाने द्यायला हवे अशा शब्दांत ठाकरे गटाने अजित पवारांना लक्ष्य केले आहे.निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे असे शरद पवार म्हणाले ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल असेही अग्रलेखात नमूद केले आहे.