Just another WordPress site

“महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? ” ठाकरे गटाचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार

राज्यात विरोधी पक्षांकडून सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात असून सत्ताधारी पक्षांमधील दोन नेत्यांकडून आधी गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर आता दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.या प्रकरणावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले असून विरोधकांनी गृहविभाग सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका सुरू केली आहे.राज्यातल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत ठाकरे गटाकडून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.अभिषेक घोषाळकर प्रकरणावरून टीका करताना सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात असुरक्षित राज्य बनले आहे.राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ‘शेमलेस’ पद्धतीने यातील गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? असे वाटू लागले आहे अशा शब्दांत अग्रलेखातून सरकारवर टीकास्र सोडण्यात आले आहे.

अभिषेक घोसाळकर या तरुण-तडफदार शिवसेना पदाधिकाऱ्याची गुरुवारी संध्याकाळी हत्या झाली.महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या मुंबई शहरात कल्लोळ माजवणाऱ्या या हत्येने मुख्यमंत्री व त्यांच्या गृहमंत्र्यांच्या तोंडावरील रेषादेखील हलली नाही.या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात.काल घडलेली घटना वैयक्तिक वैमनस्यातून घडली.याला राजकीय रंग देणे योग्य नाही असे गृहमंत्री म्हणतात.याचा तपास अद्यापि व्हायचा आहे पण गृहमंत्र्यांनी जाहीर करून टाकले,वैयक्तिक भांडणातून हत्या झाली म्हणजे या घटनेवर पडदा टाकून तपास गुंडाळण्याचा हा प्रयत्न आहे अशा शब्दांत ठाकरे गटाने टीका केली आहे.अपयशी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करताच फडणवीस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दळभद्री तसेच माणुसकीला काळिमा फासणारे आहे.गाडीखाली येऊन कुत्र्याचे पिल्लू मेले म्हणून विरोधक राजीनामा मागणार काय?’ या निर्लज्ज वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडाच.महाराष्ट्रात गुंडगिरीस बळी पडलेल्या जनतेस ते कुत्र्याची उपमा देत आहेत.हिंदू धर्मात,मानवधर्मात कुत्र्यासही म्हणजे प्राणिमात्रासही सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे तोच खरा हिंदू धर्म आहे पण फडणवीस त्यांचे गुरू मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून हवे तसे बोलत आहेत अशी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.