“अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस या दोघांनाही मारण्याची सुपारी कुणी दिली होती का?-उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली शंका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० फेब्रुवारी २४ शनिवार
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण वरकरणी दिसते तेवढे सोप नाही.ज्या गुडांने सूडभावनेतून हत्या केली असे आपण समजू पण त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या का केली? हा प्रश्न निर्माण होतो.ज्याप्रमाणे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ कुणीही न मागता समोर आला तसे मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले होते पण त्यामध्ये नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या हे दिसत नाही अशी शंका उपस्थित करून शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.आज पत्रकार परिषदेत त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार टीका केली आहे.उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,मी काल काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी माहिती दिली की,मॉरिसकडे परवानाधारक बंदूक नव्हती त्याने खासगी सुरक्षा रक्षक ठेवला होता त्याला सुरक्षारक्षक ठेवण्याची वेळ का आली? या सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून या गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जाते.अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की आणखी कुणी झाडल्या? या दोघांनाही मारण्याची सुपारी कुणी दिली होती का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले.अभिषेक घोसाळकर प्रकरणात आम्ही राज्यपालांकडे जाणार नाहीत कारण याआधीचे राज्यपाल जरा जास्तच कर्तव्यदक्ष होते.माजी राज्यपाल कोश्यारी यांचा मॉरिस या गुंडाबरोबर एकत्र फोटो आहे.राज्यपालांच्या हस्ते अशा गुंडांचे सत्कार होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर बोलताना श्वान गाडीखाली येऊन मेले तरी माझ्यावर आरोप करतील अशी टीका केली होती.या टीकेचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला लगावला.श्वान गाडीखाली मेले तर मी काय करू? असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटले.त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला.संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत.तुम्ही अतिशय निर्ढावलेले,निर्घृण आणि निर्दयी मनाचे गृहमंत्री आहात.फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस,कलंक असे शब्द वापरले होते पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत.महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्वच प्राण्यांची आणि माणसांची जबाबदारी येते.एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वानाबरोबर कशी काय करता? दिल्लीश्वरांसमोर तुम्ही श्वानासारख्या शेपट्या हलविता हे जनतेला समजलेले आहेच पण राज्यात गुंडगिरी करा,खूनखराबा झाला तरी घाबरू नका… पण भाजपात आला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडासाठी मोदी गॅरंटी आहे का? असे दिसत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.