डोंगर कठोरा येथे शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन कुटुंब उध्वस्त;शासनाकडून तात्काळ मदतीची गरज
सहा लाखापर्यंतच्या रोकड व जिवनावश्यक वस्तू आगीत जळून खाक;रात्रीपर्यंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी हजर राहून केला पंचनामा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ फेब्रुवारी २४ रविवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे काल दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान अनिल धनराज सरोदे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत त्यांच्या घरातील रोख रोकड,धान्यादी माल व जीवनावश्यक वस्तू या आगीत भस्मसात झाले तर त्याच्या शेजारील रहिवाशी दगडू गेंदु पाटील यांना देखील या आगीची झड सोसावी लागली यात त्यांचेही धान्यादी माल व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झालेल्या आहेत.परिणामी दोन्ही कुटुंबांचे किमान सहा लाखांच्या वर नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांच्या वतीने वर्तविला जात असून सदर झालेल्या नुकसानीबद्दल त्यांना शासनाच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत देऊन मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगर कठोरा येथे अनिल धनराज सरोदे हे एकाकी आपल्या घरात वास्तव्याला असून ते गावठाणावर असतांना काल दि.१० फेब्रुवारी शनिवार रोजी त्यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली.रात्री ९.३० वाजे दरम्यानची वेळ असल्याने सदरील लागलेली आग समजण्यास गावकऱ्यांना उशीर झाला.दरम्यान आगीने यावेळी मोठे रौद्ररूप धारण केले होते.परिणामी यावेळी गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी मोठे जिकरीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात येत नसल्यामुळे अखेर यावल येथील नगर पालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.यावेळी फायरमन कल्पेश बारी,ड्रायव्हर कैलास काटकर व शिवाजी पवार यांनी मोठी मेहनत घेऊन रात्री उशिरापर्यंत हि आग विझविण्यात यश मिळविले आहे.सदर आगीत अनिल धनराज सरोदे यांचे २ क्विंटल तूर,२ क्विंटल भुईमूग शेंगा,रोख रोकड ८ हजार रुपये व गृहउपयोगी वस्तू,घरांचे पत्रे,महत्वाचे कागदपत्रे असे एकूण ३ लाख १० रुपयांच्या वर नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या शेजारील रहिवाशी दगडू गेंदु पाटील यांचे ८ क्विंटल कापूस,२ क्विंटल भुईमूग शेंगा,२ क्विंटल गहू ,१ क्विंटल तुरी व घरातील संसार उपयोगी वस्तू असे २ लाख नव्वद हजार रुपयांचे नुकसान असे दोघांचे एकूण ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सदरहू अनिल सरोदे व दगडू पाटील हे फारच गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून मिळावी अशी अपेक्षा गावकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी घटनेची माहिती मिळताच सरपंच नवाज तडवी,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी,मिलिंद कुरकुरे तलाठी साकळी व ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी यांच्यासह गावातील विविध मान्यवरांनी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आग विझविण्यास शर्थीचे प्रयत्न केले.तसेच रात्रीच सरपंच नवाज तडवी,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,तलाठी वसीम तडवी व मिलिंद कुरकुरे तलाठी साकळी यांनी सदरील आगीचा पंचनामा करून आपला कर्तव्यदक्षपणा दाखून दिला आहे.प्रसंगी वायरमन मिलिंद कुरकुरे,ललित बऱ्हाटे,रवी पाटील व सहाय्यक गणेश झोपे यांनीही कर्तव्यदक्षपणा दाखवून शॉर्टसर्किट काढून महत्वाची भूमिका बजावली.याबाबत अनिल धनराज सरोदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की,”जान बची लाखो पाये”,माझे संपूर्ण घर उध्वस्त झाले असून माझ्यावरील छतासह माझे संपूर्ण जीवनच उध्वस्त झाले असल्याने शासनाकडून तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून मिळावे अशी आशा बाळगतो अशी मनीषा अनिल सरोदे यांनी पोलीस नायक प्रतिनिधीजवळ बोलतांना व्यक्त केली आहे.