माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा;भाजपात जाणार असल्याची चर्चा
चारशे पार होणारच आहात तर मग इतर पक्षातील लोकांना फोडून आपल्याबरोबर का घेताय? -उद्धव ठाकरे
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ फेब्रुवारी २४ सोमवार
ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व सोडत असल्याचे त्यांनी आज दि.१२ फेब्रुवारी रोजी जाहीर केले आहे त्यामुळे आता अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात गेले आहेत.अशोक चव्हाणही त्या नेत्यांच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे तसेच अशोक चव्हाण आता काँग्रेसवर दावा करणार का? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी उपस्थित केलाआहे.दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली,एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना आपल्याबरोबर घेत भाजपाशी घरोबा केला तसेच पुढे त्यांनी शिवसेनेवर दावा केला.निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदे यांना दिली त्याचप्रमाणे भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवार यांनीही मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेतला आहे.आता अशोक चव्हाणही काँग्रेस पक्षावर दावा करणार का? असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे असेच एक वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,काही वेळापूर्वी एक बातमी आमच्या कानावर आली की,अशोक चव्हाण भाजपात गेले.आता मी बघणार आहे की निवडणूक आयोग म्हणून दिल्लीत एक लबाड संस्था बसलीय तिने शिवसेना चोराच्या हातात दिली.त्यापाठोपाठ राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आहे आता काँग्रेसही अशोक चव्हाणांच्या हातात देतात की काय ते आपण बघुया कारण निवडणूक आयोग काहीही करू शकतो.ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले,भाजपावाले रोज दंड थोपटत आहेत परंतु बेडकुळ्या काही येत नाहीत.त्यांना बेडकुळ्या भाड्याने घ्याव्या लागतायत.संसदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक भाषण केले असून त्यात म्हणाले आहेत की,अबकी बार एवढे पार.. एवढे असतील तर मग फोडाफोडी का कारताय? तुमच्यात आत्मविश्वास नाही का? आणि वर ४०० पारच्या घोषणा करत आहेत.तुम्ही ४०० काय,४० पार करू शकणार नाही.४०० पार होणारच आहात तर मग इतर पक्षातील लोकांना फोडून आपल्याबरोबर का घेताय? तिकडे नितीश कुमारांना घेतले, इकडे अशोक चव्हाण,अजित पवारांना घेतले,त्या मिंधेला घेतले त्याऐवजी गेली १० वर्षे तुम्ही प्रामाणिकपणे काम केले असते तर भाजपावर आज ही वेळ आली नसती.