यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
तालुक्यातील साकळी येथील वार्ड क्रमांक ५ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा होत असून दुषित पाण्याची समस्या निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सदरहू या दूषित पाण्यामुळे संपुर्ण भवानी पेठ भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.दरम्यान ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या भागातील रहिवासी विलास पवार यांनी या दूषित पाण्याची समस्या अतिशय गांभीर्याने व पोटतिडकीने मांडत या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन केव्हा लक्ष देणार ? असा संतप्त प्रश्न व्यक्त करत ‘साहेब तुम्ही हे दुषित पाणी आधी पिऊन बघा ‘असे सांगत या नागरी समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.तसेच ग्रामपंचायत प्रशासनाकडून ही समस्या लवकरात-लवकर न सोडविल्यास वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करण्यात येईल असे विलास पवार यांनी म्हटले आहे.त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी या भागातील रहिवासी व ग्रामस्थ वर्ग यांच्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की,तालुक्यातील साकळी येथील वार्ड क्र.५ मध्ये भवानीपेठ भागात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याची समस्या निर्माण झालेली असून जेव्हा जेव्हा या भागात पाणी पुरवठा होतो त्यावेळी अगोदर पिवळसर रंगाचे,पिंगट दुर्गंधीयुक्त तसेच किळसवाणे पाणी पाईपातून नळावाटे घराघरात येत असते.सदरील दूषित स्वरूपाच्या पाणीपुरवठ्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य पुर्णपणे धोक्यात आलेले आहे.या समस्येविषयी ग्रामपंचायतीकडे लेखी व तोंडी तक्रार करण्यात आलेली असून या भागातील ग्रामपंचायत सदस्यांनाही तोंडी स्वरूपात कळविले आहे मात्र अद्याप या समस्येवर कुठलीही उपायोजना करण्यात आलेली नाही.दरम्यान दि.५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित ग्रामसभेत सदर भागातील रहिवासी विलास लक्ष्मण पवार यांनी सदर समस्या मांडत ही समस्या सोडवली जात नसल्याने रोष व्यक्त केला.सदर ग्रामसभा ही तहकूब करण्यात आली होती.सदरहू सदरील समस्येचे ग्रामपंचायतीला गांभीर्य आहे की नाही ? अशा स्वरूपाची विचारणा विलास पवार यांनी प्रभारी ग्रामविकास अधिकारी पी.टी.धनगर यांच्याकडे केली.व साहेब आमच्या भागातील पाणी आम्ही कसे प्यायचे? हे पाणी तुम्ही पिऊन दाखवा मग तुम्हाला या समस्येचे गांभीर्य कळेल असे म्हणत गावकऱ्यांची कैफियत ग्रामपंचायत प्रशासनासमोर मांडून या समस्येवर चर्चा झाली पाहिजे अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.दरम्यान सरपंच दिपक पाटील,उपसरपंच फक्रोद्दीनखान कुरेशी तसेच काही पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी धनगर यांनी सदर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.सदरहू सदरील भवानी पेठ भागातील उद्भवलेली दूषित पाण्याची समस्या अतिशय गंभीर व जिवघेणी असून तक्रार करूनही ती अद्यापपर्यंत सोडवलेली नसली तरी येत्या काही दिवसात ही समस्या ग्रामपंचायत प्रशासनाने न सोडविल्यास या समस्येविषयी वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल असे विलास पवार यांनी म्हटले आहे.