“भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन;माझ्या कामातूनच मी उत्तर देईन”
भाजपा प्रवेशाबाबत अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ फेब्रुवारी २४ मंगळवार
ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.काँग्रेस पक्षासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी स्पष्ट केले नव्हते परंतु आज त्यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.माध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले,आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहे.आज मी रितसर भाजपात प्रवेश करणार आहे.दुपारी बारा-साडेबारा वाजता पक्षप्रवेश होईल.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अन्य जिल्ह्यांतील संभाव्य पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.दरम्यान अशोक चव्हाणांसह काही आमदार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु त्यांच्याबरोबर इतर कोणतेही आमदार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून या पक्षप्रवेशासाठी मी कोणालाही आमंत्रित केलेले नसल्याचेही ते म्हणाले तसेच काँग्रेसचा राजीनामा दिलेले अमर राजूरकरही आज भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले,तो विषय आता संपला आहे यासंदर्भात मी आता तुमच्याशी दुपारी बोलेन.
जिल्ह्यातील,मतदारसंघातील बरेच लोक मुंबईत दाखल झाले आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे.नवीन सुरुवात करायची आहे. जिल्ह्यातील समीकरणे आहेत हे सगळ लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा प्रयत्न आहे आमचा असेही चव्हाण म्हणाले.जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केले आहे.भाजपात असतानाही प्रामाणिकपणे काम करेन.माझ्या कामातूनच मी उत्तर देईन असे म्हणत अशोक चव्हाणांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला.येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करू असे ते म्हणाले होते.दरम्यान आज सकाळपासूनच त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली त्यानुसार आज ते पक्षप्रवेशासाठी घराबाहेर पडताच माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आजच पक्षप्रवेश होणार असल्याचे अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले.मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींपाठोपाठ एक माजी मुख्यमंत्री काँग्रेसमधून बाहेर पडल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही गळती लागल्याचे स्पष्ट झाले आहे.चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचेही सांगितले जात आहे.