दसरा मेळाव्यादरम्यान उद्या सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे
मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-अगदी काही तासांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे.शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे पार पडत आहेत.शिवतीर्थावर ठाकरेंचा पारंपारिक दसरा मेळावा होईल तर वांद्रे कुर्ला संकुलातील विशाल मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तब्बल लाखभर लोकांना संबोधित करतील.दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.दसरा मेळाव्यावर नक्षलवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचे वृत्त आल्यानंतर मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी शिवतीर्थ आणि बीकेसीतील जागांची गेली आठवडाभर सातत्याने पाहणी करतायेत.आज फायनल व्हिजीट देताना मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील(कायदा-सुव्यवस्था)यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दीची जमवाजमव करतांना लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत.यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे.इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने मुंबईत तब्बल दोन लाख शिवसैनिक दाखल होण्याचा अंदाज आहे.गेल्या काही दिवसांपासून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष सुरु असताना एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असताना मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आलेली आहे.दोन्ही गटांवर बारीक लक्ष ठेऊन कायदा सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कसोशीने प्रयत्न असणार आहे.याच पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संवाद साधला.
उद्या आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे.शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईत येत आहेत.दोन मेळावा पार पडत आहेत. आपल्या सगळ्यांना उद्या डोळ्यात तेल घालून काम करायचे आहे.उद्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मोबाईल वापरु नये.इतरवेळी पोलीस मोबाईलमध्ये व्यग्र असतात.पण उद्या आपल्याला मोबाईल वापरुन चालणार नाही.कारण त्याच काळात कुणीतरी संधीचा गैरफायदा घेऊ शकतो.त्यामुळे आपले मोबाईल तुमच्या सब इन्स्पेक्टरकडे (पोलीस उपनिरीक्षक)जमा करायचे आहेत.गरजेवेळी एक दोन तासाला तुम्ही तुमचे मोबाईल चेक करु शकता.आपण सब इन्स्पेक्टरकडे एक बॅग देत आहोत.त्या बॅगमध्ये तुमचे मोबाईल असतील.वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील हीच सूचना असेल असे नांगरे पाटील यांनी आवर्जून सांगितले आहे.उद्याच्या दसरा मेळाव्याचा बंदोबस्त आपल्या यशस्वीपणाने पार पाडायचा आहे.मुंबई पोलीस दलाचील कर्मचारी आणि अधिकारी उद्यासाठी सज्ज आहेत.दोन्ही मेळाव्यांच्या दृष्टीने खूप सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये गर्दीचे नियोजन,पार्किंगच्या जागा,रस्त्यांची माहिती या गोष्टींसह विनाकारण तणाव निर्माण होणार नाही तसेच विरोधी गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येणार नाही यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करतील तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या असल्याचे नांगरे पाटलांनी यांनी सांगितले आहे.जवळपास दोन ते अडीच हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती बीकेसीमध्ये असणार आहे तर तेवढ्याच संख्येने शिवाजी पार्कातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.फक्त मुंबई पोलिसच नाही तर स्पेशल युनिट,एसआरपीएफच्या टीम्स,रॅपिड ऍक्शन फोर्स,एटीएस या टीमही दसरा मेळाव्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.दोन्ही गटांचा दसरा मेळावा शहरात कोणताही अनुचित प्रकार न होता सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या आणि खबरदारीच्या सर्व उपाययोजना करत आहेत असे मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील(कायदा-सुव्यवस्था)यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.