“लोकशाहीचा हा मोठा विजय” ; सर्वोच्च न्यायालयाकडून शरद पवार गटाला अंतरिम दिलासा
पुढील आदेश येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव कायम ठेवावे-सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारी रोजी अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला होता तसेच शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असे नाव देण्यात आले होते परंतु हे नाव केवळ आगामी राज्यसभा निवडणुकीपुरते मर्यादित असणार आहे त्यामुळे हेच नाव कायम ठेवण्यात यावे आणि लवकरात लवकर चिन्ह मिळावे या मागणीकरता शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली होती.या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने काल शरद पवार गटाला अंतरिम दिलासा दिला आहे यावरून शरद पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून पोस्ट केली आहे.शरद पवार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी दिवशी,भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला आहे.हा मतदारांचा विजय आहे कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय ? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.