“आज सगेसोयऱ्याचा विषय घेऊ नका,उद्या मी आंदोलनाची दिशा ठरवतो”-मनोज जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला इशारा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
मराठा आरक्षणाचा विषय सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच तापला असून राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवले आहे.या अधिवेशनाच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली जाणार आहे मात्र यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.सगेसोयरेची अधिसूचना पाळायचीच नव्हती तर मग काढलीच कशाला? असा परखड सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलतांना विशेष अधिवेशनाबाबत आपली भूमिका मांडली आहे.ओबीसींमध्ये जे आमचे आरक्षण आहे ते आम्हाला हवे आहे.सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हायला हवी ते सोडून तुम्ही दुसराच विषय अधिवेशनात घेत आहात.वेगळे आरक्षण १००-१५० जणांना लागू पडेल फक्त. सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करायचीच नव्हती तर मग ती अधिसूचना कशाला काढली? तुम्ही लोकांना वेड्यात काढताय का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे ही मूळ मागणी आहे त्यावर तुम्ही चर्चाच करणार नसाल तर हे अधिवेशन घेतलेच कशाला ? या अधिवेशनाची आम्हाला गरजच काय? ज्याची मागणीच नव्हती तेच आरक्षण आम्हाला देत आहात? टिकणार नसलेले आरक्षण तुम्ही देताय.ईसीबीसीमध्ये जे झाले तेच आताही पुन्हा होणार.त्या मुलांच्या अजूनही नियुक्त्या झालेल्या नाहीत हे आरक्षण तुम्ही देणार हे राज्यापुरते आहे हे टिकणार नाही.मागे ७ वर्षं आम्ही आंदोलन केले.आता चार वर्षांपासून हे चालू आहे म्हणजे आमच्या दोन पिढ्या आंदोलनात चालल्या आहेत अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी आपली उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.लोकांची मागणी आहे की ५० टक्क्यांच्या आत ओबीसींमध्ये आरक्षण द्या.तीन महिन्यांपूर्वी तुम्हीच ठरवता की सगेसोयऱ्यांचा कायदा बनवायचा.तुमचेच लोक येतात.तुमचेच मंत्री येतात, सगेसोयऱ्याची व्याख्या तयार करतात त्यात आरक्षण देण्याचे तुमचेच लोक सांगतात.आता विशेष अधिवेशनाच तो मुद्दाच घेणार नसाल तर बोलवले कशाला ते अधिवेशन तुम्ही? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.करोडो मराठा रस्त्यावर आलाय त्याची मागणी काय आहे हे तुम्हाला कळत नाही का? मराठ्यांच्या पोरांचे मुडदे पडलेत यासाठी.तज्ज्ञ,अभ्यासक त्यांना सांगून थकलेत.ओबीसींचे आरक्षण आम्हाला द्या हा आमचा हट्ट नाही.आमचे हक्काचे आरक्षण तिथे आहे ते आम्हाला पाहिजे.सगेसोयऱ्याची अधिसूचना काढता आणि विशेष अधिवेशनात तो विषयच घेत नाही.तुम्ही का मराठ्यांना वेडे समजता का? तुम्ही आज सगेसोयऱ्याचा विषय घेऊ नका, उद्या मी आंदोलनाची दिशा ठरवतो. मराठ्यांचा एकही माणूस तुम्हाला घरात दिसणार नाही.सगळे रस्त्यावर उतरणार आहेत.तुम्हाला कळतच नाही तर सरकार चालवता कसे तुम्ही?” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.