“२४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको,तर ३ मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको”,मनोज जरांगेंनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले
आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार
राज्यात २८ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज अनेक दशकांपासून पिढ्यान् पिढ्या मागासलेला राहिला व हा वर्ग इतका दुर्बल आणि वंचित आहे की त्याला विद्यमान मागासवर्गीयांपासून स्वतंत्र आरक्षण देणे गरजेचे आहे असा निष्कर्ष नोंदवत आणि हीच अपवादात्मक आणि असाधारण परिस्थिती असल्याचे नमूद करून राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस केली ही शिफारस स्वीकारून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले. विधिमंडळात विशेष अधिवेशनात मंगळवारी हा कायदा कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आला.दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवून सगेसोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे आता त्यांनी आंदोलनची पुढची भूमिका आज स्पष्ट केली असून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २३ फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.त्यानुसार सरकारने सगसोयऱ्यांसदर्भात कायदा केला नाही तर २४ फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे त्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांना आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. २४ फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात,शहरात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे.या काळात प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको करायचा आहे असे आवाहन मनोज जरांगेंनी आज मराठा बांधवांना केले.ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन करता येणार नाही त्यांनी सायंकाळी चार ते रात्री ७ वाजेपर्यंत आंदोलन करायचे आहे असे मनोज जरांगे म्हणाले.तसेच या काळात शांततेत आंदोलन करायचे आहे.जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि.२२ आणि २३ फेब्रुवारीला आंदोलनाचे निवेदन द्या.हे निवेदन कायम स्वरुपाचे आहे.आपल्याला असे आंदोलन सुरू करायचे आहे की आपण आपले गाव सांभाळायचे.कोणीही तालुक्याला किंवा जिल्ह्याला यायचे नाही.आपल्या गोर गरीब मराठ्याचा पैसा वाचेल.पूर्ण गाव आंदोलनात उभे राहिल्याने शक्ती वाढेल.गावात असल्याने घराला कुलूप लावून आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि मागेही जाऊ शकतो.आपल्याला आंदोलन यांना जेरीस आणण्यासाठी करायचे आहे.माझा किंवा कोणाचाही हट्ट पूर्ण करण्यासाठी आंदोलन करायचे नाही.महाराष्ट्रभर प्रत्येकाने आपल्या गावात आंदोलन करायचे आहे.प्रत्येकाने रास्ता रोको करायचा आहे.हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे.जाळपोळ वगैरे काही नाही असे जरांगे पाटील म्हणाले.दरम्यान २४ तारखेपासून आपल्या गावात-शहरांत रास्ता रोको केल्यानंतर ३ मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यांत,एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी १२ ते १ मध्ये मोठा रास्ता रोको करायचा आहे.आतापर्यंत अनेक मोठ्या सभा,रॅली आणि आंदोलने झाली पण एवढा मोठा रास्ता रोको झाला नसेल असेही मनोज जरांगे म्हणाले.