“मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही,मात्र त्यांच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण ?”
मनोज जरांगेच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी वरून देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ फेब्रुवारी २४ मंगळवार
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीमधल्या पत्रकार परिषदेतून देवेंद्र फडवीसांवर गंभीर आरोप केले असून या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले.विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली मात्र त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्याची भूमिका बदलून बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केला तसेच त्यांनी उपचारही घेतले.यासंदर्भात आज विधानसभेमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला.आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचे आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनीही आपली भूमिका सभागृहासमोर मांडली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे व त्यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांमागे कोण आहे? असा प्रश्न करत आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत अप्रत्यक्षपणे विरोधकांना लक्ष्य केले.यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.यासंदर्भात आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असतांना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत त्यांची सविस्तर भूमिका मांडली.या विषयावर माझी बोलायची इच्छा नव्हती पण तरी विषय निघालाच आहे तर काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत असे मला वाटते.या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाबाबत मी काय केलय हे पूर्णपणे माहिती आहे.मी मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकवले.जोपर्यंत मुख्यमंत्री होतो,सर्वोच्च न्यायालयातही टिकवले.सारथीसारखी संस्था सुरू करणे,विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देणे अशा योजना आपण सरकारच्या वतीने सुरू केल्या त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी जे काही केलय ते मराठा समाजाला माहिती आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे काही माझ्याबद्दल बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्यामागे नाही,माझ्यामागे उभा राहिला आहे.दु:ख या गोष्टीचे आहे की,अशाप्रकारे कुणीही कुणाची आई-बहीण काढेल.आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगतो.कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते पण त्यांचे नाव घेऊन लोकांच्या आयाबहिणी काढायच्या ? पण माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाहीये यामागे कोण आहे हे शोधावेच लागेल अशी सूचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान,काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केल्यानंतर त्यावरूनही फडणवीसांनी टीका केली.दगडफेक करणारे सांगत आहेत की त्यांना दगडफेक करायला कुणी सांगितले! पोलिसांचा लाठीचार्ज महत्त्वाचा आहेच पण तो का झाला ? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे.कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगेंना परत आणणारे कोण आहेत ? त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत ? कुणाकडे बैठक झाली ते आरोपीच सांगत आहेत.दगडफेक करा असे सांगितल्याचे आरोपीच सांगत आहेत.पोलीस आपले नाहीयेत का ? असे सवाल फडणवीसांनी उपस्थित केले.
दुर्दैवाने आपण बीडची घटना विसरत आहोत हे आंदोलन शांततेने झालेले नाहीय.मराठा समाजाने काढलेले मोर्चे शांततेतच झाले होते पण यावेळी शांतता नव्हती.कुठल्या स्तराला आपले राजकारण चालले आहे ? त्यांचे फोटो कुणासोबत निघतायत ? कोण त्यांच्यासोबत होते ? हे सगळे बाहेर येतय अशाप्रकारे कुणी कुणीची आई-बहीण काढणार असेल तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की त्यांनी संबंधित सदस्याच्या पाठिशी उभे राहायला हवे मग ते विरोधी पक्षाचे असो किंवा सत्ताधारी.विरोधकांच्या बाबतीत असे घडले तरी हा देवेंद्र फडणवीस त्यांच्यामागे ताकदीने उभा राहील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.यासंदर्भात एसआयटी उभी राहीलच पण मला मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही त्यांच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे ते समोर आले पाहिजे.काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात तीच स्क्रिप्ट त्यांच्याकडून येत आहे.वॉररूम कुणी कुठे उघडली याची माहिती आहे आमच्याकडे.आम्ही सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढले जाईल असेही ते म्हणाले आहेत.