मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२ मार्च २४ शनिवार
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे देशभरातील विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.दरम्यान युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका चालू आहेत.महाराष्ट्रात महायुतीत भारतीय जनता पार्टी,शिवसेनेचा शिंदे गट,राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि इतर लहान पक्ष आहेत या पक्षांमध्ये सध्या वाटाघाटी चालू आहेत तसेच लोकसभा निवडणुकीनंतर काहीच महिन्यात विधानसभा निवडणूकही होणार आहे त्यामुळे विधानसभेबाबतही विचार चालू आहे अशातच काही जागांवरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.शिवसेना पक्ष फुटून दोन गट पडले आहेत त्यापैकी एक गट महायुतीत आहे.संयुक्त शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत तर १५ आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत तसेच संयुक्त शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटात तर ५ खासदार ठाकरे गटात आहेत.अशातच जे आमदार आणि खासदार ठाकरे गटात आहेत त्यांच्या जागा आपल्याला मिळाव्या यासाठी भाजपाकडून प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे.भाजपाला शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही जागा हव्या आहेत त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचे बोलले जात आहे परंतु यावर शिवसेनेच्या शिंदे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी जागावाटपावर भाष्य केले आहे.रत्नागिरी मतदारसंघ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत आहे.यावर रामदास कदम म्हणाले,भाजपा रायगड आणि रत्नागिरीच्या जागेसाठी अग्रही आहे म्हणे… तुम्ही (भाजपा) रायगडमध्ये सांगाल आम्हीच… उद्या म्हणाल रत्नागिरीतही आम्हीच… त्यामुळे मला त्यांना सांगायचे आहे की,असे होत नसते.रत्नागिरी ही आमची जागा आहे तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे त्या जागेवर पूर्णपणे शिवसेनेचा अधिकार आहे.तुम्ही रत्नागिरीची जागा मागाल,रायगडची जागा मागाल,तुम्हाला (भाजपाला) सर्व पक्षांना संपवून एकट्यालाच जिवंत राहायचे आहे का ? भाजपाविरोधात अधिक आक्रमक होत रामदास कदम म्हणाले,या सगळ्यावरून असा निष्कर्ष निघेल की,सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचे आहे परंतु असे होणार नाही.आपण दोघे भाऊ-भाऊ,तुझे आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू…असे चालणार नाही.महायुतीत असे होता कामा नये.कुठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही ती जागा आम्ही लढवणारच.ती आमच्या हक्काची जागा आहे तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे.
रामदास कदम म्हणाले,रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार आमच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. विद्यमान खासदारांची निवडणुकी आधीची शेवटची सभा मी स्वतः घेतली होती.मी सावंतवाडीला जाऊन शिवसेना उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली होती.आम्ही आमच्या हक्काची जागा का सोडावी ? आमच्या या भूमिकेमुळे युतीत अजिबात फूट पडणार नाही.प्रत्येकाला वाटते की,माझा पक्ष मोठा झाला पाहिजे त्यामुळे असा विषय काढून प्रयत्न केला जातो.हळूच विचारून पाहू… जमले तर जमले… असा असा प्रकार केला जातो याचा अर्थ माझे आहे ते माझेच आहे आणि तुझे आहे ते पण माझेच आहे.राजकारणात असे कधी होत नाही.