परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):- आईसह चार वर्षीय आणि दोन वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील निवळी तलावामध्ये घडली आहे.दुसऱ्या दिवशी या आईचा मृतदेह आढळून आला आहे.या घटनेमुळे जिंतूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने मृत्यूचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे.नसरीन रसूल पठाण (वय २६ वर्षे), सना रसूल पठाण (वय २ वर्षे),आयान रसूल पठाण (वय ४ वर्षे)असे बुडून मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,जिंतूर तालुक्यातील निवळी येथील विवाहित महिला नसरीन रसूल पठाण या घर सोडून गेल्याने निवळी येथील जलाशयातील कॅनलच्या पाण्यात बुडाली असल्याचा संशय ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास लावण्यात आला होता.दरम्यान बोरी पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरु झाले घटनेच्या सायंकाळच्या सुमारास दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले.मात्र विवाहित महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोधकार्य चालूच होते.परंतु रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्य थांबवले होते.नंतर ५ ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरु केले असता शोधाशोध झाल्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास जलाशयातील पाण्यामध्ये विवाहित महिला नसरीन रसूल पठाण यांची देखील मृत अवस्थेतील शव मिळाला आहे.या घटनेत नसरीन रसूल पठाण,सना रसूल पठाण,आयान रसूल पठाण अशा तिघांचा मृत्यू झाला आहे.११ वर्षीय मुलगी ही शाळेत गेलेली होती म्हणून तिचा जीव वाचला असावा अशी चर्चा होत आहे.घटनास्थळी बोरी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी रुग्णालयात करण्यात आले असून दफन विधी जिंतूर शहरातील फुखरा कबरस्तान येथे करण्यात आले आहे.