Just another WordPress site

“आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला आहे”-प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात धार्जिण्या भूमिकेवर टीका केली तसेच महाराष्ट्राबाहेर गेलेल्या उद्योगांवरही त्यांनी टीका केली.आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते.तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणले तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा.मला माहिती आहे की,तुम्हाला या गोष्टी पचवणे कठीण आहे पण इथले कारखाने पळवलेत की नाही ? मग उद्या पुन्हा ते पळवले जातील.मतांच्या रुपाने तुम्ही मोदींना त्या गोष्टीचे लायसन्स द्याल त्यामुळे भाजपला मतदान करु नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

मागच्या दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारच्या कारभारामुळे प्रत्येकाच्या डोक्यावरचे कर्ज वाढले आहे.एखाद्याला १० हजार पगार असेल आणि बँकेला हप्ता म्हणून १० हजार रुपये द्यावे लागत असतील तर शिल्लक राहते का काही ? मग माणूस घर-दार विकायला काढतो.मोदी आणि आरएसएसला परत निवडून दिले तर २०२६ मध्ये हा देश कर्जात डुबलेला असेल.जगण्यासाठी दारुडा जसा भांडी विकतो,फर्निचर विकतो आणि मग शेवटी घर विकतो आणि रस्त्यावर येतो. भाजपाकडे सत्ता गेली तर अशीच वेळ येऊ शकते.माझे भाजपाला आव्हान आहे मी खोटे बोलत असेल तर मला खोडून दाखवा असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.तुम्हाला कर्जात डुबायचे नसेल तर तुमचे मत भाजपाच्या विरोधात दिले पाहिजे. मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर २४ रुपयांचे कर्ज होते.गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत दरडोई कर्जाचा आकडा ८४ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे असाही आरोप आपल्या भाषणांत प्रकाश आंबेडकरांनी केला.

देशात तपास यंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहेत.मागच्या दहा वर्षांत सरकारने किती धाडी घातल्यात याचे हे जरा आकडेवारी देऊन सांगितले पाहिजे.धाडी घालणे तुमचा अधिकार आहे पण त्यापैकी किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली? उलट असे दिसत आहे की,गंगेत स्नान केल्यासारखा चोर भाजपमध्ये साफ होऊन जातो.देशाची व्यवस्था एवढी बिघडवलेय की,कोर्टाला म्हणावे लागले की मीच आता निवडणूक अधिकारी.चंदिगडमध्ये भाजपाने काय केले ? भय निर्माण केले.कोर्टातदेखील अधिकारी खरे बोलत नाही.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मते मोजली तेव्हा जिंकलेला माणूस हरलेला होता आणि हरलेला माणूस जिंकला होता हे स्पष्ट झाले.आपण देशात नवा हुकूमशाह निर्माण केला आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.