नवनीत कौर राणा यांना अमरावतीत शिवसेनेकडून विरोध होत होता तसेच येथील माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका अडसूळ यांनी घेतली होती तसेच अमरावतीमधील एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार जशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांचाही राणा यांना विरोध आहे.अशा परिस्थितीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते परंतु भाजपाने राणा यांना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.भाजपाने काही वेळापूर्वी लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील अमरावतीतून नवनीत राणा यांना तर कर्नाटकच्या चित्रदूर्गमधून गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे.

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला असून ते म्हणाले,आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ज्या नवनीत राणाने आम्हाला अपमानित केले त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही.कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही.राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही.काहीही झाले तरीही राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे असे बच्चू कडू यांनी नमूद केले आहे.नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्‍या व त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला त्‍यानंतर त्‍यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते.२०१४ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या उमेदवारीवर अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती परंतु त्‍यावेळी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचा तब्बल १ लाख ३७ हजार मतांनी पराभव केला होता.राणांच्‍या जात प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार म्‍हणून निवडणूक लढवली व त्‍यांच्‍या उमेदवारीला कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने पाठिंबा दिला होता.या निवडणुकीत त्यांनी अडसूळ यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला होता.