मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ एप्रिल २४ बुधवार
शिवेसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे व यावेळी आजच शिवसेनेत प्रवेश केलेल्या उन्मेष पाटलांना नाही तर जळगावातून करण पवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची दुसरी उमेदवारांची यादी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे.धक्कादायक म्हणजे या यादीत थोड्याच वेळापूर्वी भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतलेल्या उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही तर जळगावातून करण पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर कल्याणमधून वैशाली दरेकर राणे,हातकणंगले येथून सत्यजीत पाटील आणि पालघर येथून भारती कामडी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी चार मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली.यावेळी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार ज्यांनी आज उन्मेष पाटलांसोबत शिवसेनेत प्रवेश घेतला त्यांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे व आश्चर्यकारक भूकंप होणार अशा बातम्या येत होत्या तो आज सगळ्यांनी पाहिला.मी उन्मेष पाटील आणि कार्यकर्त्यांचे स्वागतच नाही तर अभिनंदन करतो कारण आजपर्यंत कोणीही इकडे-तिकडे गेले की शिवसेनेला धक्का असे मी वाचत होतो असा धक्का खाणारी शिवसेना नाही,शिवसेना जेव्हा धक्का देते जेव्हा जोरदार देते.सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे त्यात बदल व्हावा,सत्ताबदल व्हावा त्यासाठी लढतोय असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.