Just another WordPress site

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या हालचाली थेट दिल्लीवरून ?

आशिष शेलार व चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिल्लीत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने वेगवान हालचाली सुरु केल्या आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच एखाद्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसाठी ही पोटनिवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरण्याचे जवळपास निश्चित आहे.मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्यादृष्टीने अंधेरीतील ही लढाई शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी मोठी प्रतिष्टेची ठरणार आहे त्यामुळे भाजपने कोणत्याही परिस्थितीत ही पोटनिवडणूक जिंकायची ठरवले आहे त्यासाठी आता थेट दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत रणनीती आखली जात असल्याची चर्चा चर्चिली जात आहे.भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची ही पहिलीच निवडणूक आहे.तर आशिष शेलार यांचीही मुंबई अध्यक्षपद मिळाल्यानंतरची पहिली निवडणूक आहे त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारसोबत या दोघांसाठीही अंधेरीतील पोटनिवडणूक हा प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे.गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात झालेली प्रत्येक पोटनिवडणूक भाजपने पूर्ण ताकदीने लढवली आहे त्यामुळे या निवडणुकीतही भाजप पूर्ण ताकदीने उतरेल हे स्पष्टच आहे.

राज्यात पुन्हा सत्ता आल्यामुळे भाजपची ताकद कैकपटीने वाढली आहे. याशिवाय ही पोटनिवडणूक मुंबईत होत असल्याने शिवसेनेशी थेट दोन हात करण्याची संधी चालून आली आहे.अंधेरीची ही पोटनिवडणूक जिंकल्यास मुंबई महानगरापालिका निवडणुकीच्यादृष्टीने वातावरणनिर्मिती करत असलेल्या भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.याउलट अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा विजय झाल्यास जनमत ठाकरेंच्या बाजूने असल्याचा संदेश जाऊ शकतो.त्याचा परिणाम भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवरही होऊ शकतो.त्यामुळे भाजपकडून ही पोटनिवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली जात आहे.अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई आणखीनच तीव्र झाली आहे.या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह कोणाला मिळणार?याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.तर ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांकडून धनुष्यबाण या राखीव चिन्हाची मागणी केली गेल्यास ते गोठविण्याचा आदेश आयोगाकडून दिला जाऊ शकतो अशी परिस्थिती ओढवल्यास शिवसेना ३ नोव्हेंबर २२ रोजी अंधेरीत होणारी पोटनिवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार हे पाहावे लागेल.अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबर २२ रोजी जाहीर केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.