मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.९ एप्रिल २४ मंगळवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली असून कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी सक्तवसुली संचालनालयाच्या समन्स आणि चौकशीमुळे अधिक चर्चेत आहेत.कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर होताच काही तासांत ईडीने त्यांना समन्स धाडले आहेत.खिचडी वितरणात कथित गैरव्यवहाराप्रकरणी चौकशीसाठी ईडीने कीर्तिकरांना काल ८ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलावले होते.ईडीने काल सलग सात तास त्यांची चौकशीदेखील केली. दरम्यान कीर्तिकरांना वायव्य मुंबईत महायुतीकडून कोणाचे आव्हान असणार असा प्रश्न अनेकांना पडला होता व याचे उत्तर काही वेळापूर्वी मिळाले असून अमोल कीर्तिकरांना त्यांचे वडील गजानन कीर्तिकर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आव्हान देणार आहेत.गजानन कीर्तिकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.गजानन कीर्तिकर हे या मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फुटून दोन गट पडल्यानंतर गजानन कीर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात गेले तर त्यांचे पूत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत महायुतीने वायव्य मुंबई मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेला नाही.गजानन कीर्तिकर यांना यंदा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती अशातच शिवसेनेच्या उबाठा गटाने विद्यमान खासदार गजानन कीर्तिकरांचे पूत्र अमोल कीर्तिकरांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले असून उमेदवारी मिळाल्यापासून अमोल किर्तीकरांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला आहे.दरम्यान अमोल कीर्तिकरांना वायव्य मुंबईत महायुतीतला कोणता नेता आव्हान देणार? गजानन कीर्तिकरांना शिंदे गट उमेदवारी देणार का ? महायुतीतले इतर पक्ष गजानन कीर्तिकरांना पाठिंबा देणार का ? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले होते यावर गजानन कीर्तिकरांनी स्वतःच उत्तर दिले आहे.ते म्हणाले होय मी अमोलविरोधात लढणार आहे.महायुतीने अद्याप त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केलेली नाही त्याआधीच गजानन कीर्तिकरांनी हे वक्तव्य केले आहे.गजानन कीर्तिकर म्हणाले,तुमच्या सर्वांचा मनात प्रश्न आहे की,मी अमोल विरोधात लोकसभा निवडणूक लढणार का ? तर त्याचे उत्तर होय असे आहे.मी अमोलविरोधात उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे.मला आधीच सांगितले होते की तुम्ही निवडणूक लढा… मात्र मीच विचारांत होतो की,मुलाविरोधात निवडणूक लढलो तर समाजात एक वाईट संदेश जाईल.मी ही निवडणूक लढलो तर समाज म्हणेल हा आता वयस्कर झाला आहे इतकी वर्षे राजारणात आहे आता मुलगा पुढे जातोय तर हा त्याला अडवतोय अशा पद्धतीची माझ्याबद्दलची मतमतांतरे होती मात्र मी ही निवडणूक लढवायचे ठरवले आहे असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले आहे.