Just another WordPress site

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला सत्ताबदलाचा विश्वास

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२३ एप्रिल २४ मंगळवार

काँग्रेसचे नेते पक्षाला सोडून जात असले तरी तळागाळातील कार्यकर्ते पक्षाबरोबरच आहेत व जोपर्यंत बुथस्तरीय किंवा ब्लॉकस्तरीय कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत तोपर्यंत आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वास काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात विविध प्रश्नांची उत्तरे देताना व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रालोआला ४०० जागा मिळतील तर राहुल गांधी भाजपला १५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असे म्हणतात त्याबद्दल विचारले असता खरगे यांनी देशात सत्ताबदल होईल असा विश्वास व्यक्त केला.ते म्हणाले की,मोदी बोलतात त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे व त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही.त्यांना रोखण्यासाठी आम्ही आवश्यक संख्याबळ जमा करत आहोत.आम्ही भाजपला दाखवून देऊ की विरोधकांना नाही तर जनतेला बदल हवा आहे.‘इंडिया’ आघाडी मजबूत संख्याबळासह पुन्हा येईल आणि त्यांचा पराभव करेल.पंतप्रधान मोदी यांना पराभवाची भीती भेडसावत असल्याचा दावा खरगे यांनी केला आहे.

हिंदी पट्टयामधील काँग्रेसच्या स्थितीबद्दल विचारले असता खरगे यांनी उत्तर प्रदेश,बिहारचा काही भाग आणि उत्तराखंड यासारख्या काही ठिकाणी पक्षाची स्थिती चांगली नसल्याचे मान्य केले मात्र अन्य राज्यांमध्ये पक्ष मजबूत असून उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष (सप) आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्याबरोबर केलेल्या आघाडीचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.पंजाब,राजस्थान,मध्य प्रदेश, छत्तीसगड,महाराष्ट्र आणि आसाम तसेच ओडिशामध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली होईल असे ते म्हणाले.काँग्रेस पक्ष राज्यघटना आणि लोकशाहीबद्दल बोलतो पण लोकांचे मुद्दे उपस्थित करत नाही अशी टीका होते या प्रश्नाचे उत्तर देताना खरगे यांनी महागाईविरोधात पक्षाने सर्व राज्यांमध्ये निदर्शने केल्याचे सांगितले.या निवडणुकीत काँग्रेस ३०० पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवत आहे यामुळे राष्ट्रव्यापी पक्ष म्हणून दावा सोडून दिला आहे का असे विचारल्यावर खरगे यांनी सांगितले की,काँग्रेस पक्ष ३५० पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवत आहे तसेच २८० जागांवर उमेदवार घोषित केले आहेत.महाराष्ट्रात केले त्याप्रमाणे मित्र पक्षांना सामावून घेण्यासाठी काही जागांचा त्याग करावा लागतो. ‘इंडिया’ आघाडी एकसंध ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.‘इंडिया’ची सत्ता आल्यास राहुल गांधी यांना मागे राहून २००४ प्रमाणे अन्य कोणाला तरी सरकारचे नेतृत्व करण्यास सांगितले जाईल का असा प्रश्न खरगे यांना विचारण्यात आला.त्यावर ते म्हणाले की,मला हे समजत नाही की १९८९ नंतर गांधी कुटुंबाचा कोणता सदस्य पंतप्रधान,उपपंतप्रधान,मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री झाला आहे ? मोदीजी केवळ गांधी कुटुंबांसाठी अपशब्द वापरत असतात असा आरोप खरगे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.