मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० एप्रिल २४ मंगळवार
मराठी माणसाचे जे शत्रू आहेत,मराठी माणसाने ज्यांना गाडले असे अतृप्त आत्मे भटकत आहेत.त्यात गुजरातच्या अतृप्त आत्म्याची भर पडली आहे असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता.या टीकेला आता संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.नरेंद्र मोदी म्हणजे गुजरातचा अतृप्त आत्मा आहेत असा उल्लेख त्यांनी केला आहे.महाराष्ट्र अतृप्त आत्मे भटकत असले तरीही त्यांना घाबरत नाही.महाराष्ट्रात ढोंग,अंधश्रद्धा, फेकाफेकी चालत नाही.महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे.छत्रपती शिवरायांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सुपुत्र जन्माला आले. मोदीजी पुण्यात होते त्यांनी डॉ.आंबेडकरांचा उल्लेख तरी केला का ? कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवर राग आहे.संविधान बदलायचे आहेत म्हणून हे आत्मे भटकत आहेत.मोदी काय म्हणत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका.१०५ आत्मे ज्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान केले ते मोदींना शाप देणार आहेत.मोदींनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचे जितके नुकसान केले तेवढे कुणी केले नसेल असे संजय राऊत म्हणाले.
अतृप्त आत्म्यांच्या विरोधात आमची लढाई आहे.उद्या महाराष्ट्रातल्या १०५ हुतात्म्यांना आम्ही आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की या अतृप्त आत्म्यांचा बदला घेऊ.भटकता आत्मा जर पंतप्रधानपदी बसला तर राज्याची भुताटकी आणि स्मशान होऊन जाईल.लोकशाहीत पाच चेहरे असले तर काय बिघडले ? आम्ही पंतप्रधान लादणार नाही असे म्हणत संजय राऊत यांनी मोदींना उत्तर दिले आहे.आपल्याकडे म्हणतात काही अतृप्त आत्मा असतात.त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाहीत त्यामुळे ते दुसऱ्यांच्या स्वप्नांमध्येही माती कालवतात.४५ वर्षांपूर्वी इथल्या एका बड्या नेत्याने आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी या खेळाची सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली.अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करु शकले नाहीत.हे फक्त विरोधी पक्षालाच अस्थिर करत नाही तर आपल्या पक्षात,कुटुंबातही ते असेच करतात.१९९५ मध्येही हा अतृप्त आत्मा शिवसेना भाजपाचे सरकार अस्थिर करु पाहात होता.२०१९ मध्ये या अतृप्त आत्म्याने काय केले ते महाराष्ट्राला माहीत आहेच.आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न या अतृप्त आत्म्याने सुरु केला आहे असे म्हणत नरेंद्र मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला त्यावर आता संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.