“सोन्याच्या ताटात जेवत असतांना तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा झाली” जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेवर खोचक टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१ मे २४ बुधवार
भाजपाने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडून ठेवले असून कल्याण-डोंबिवलीत भाजपा प्रचारात उतरायला तयार नाही आणि दुसरीकडे ठाणे मतदारसंघ आम्हालाच हवा असा दबाव त्यांनी कायम ठेवला आहे.आपल्या घरात आपण राजे असतो पण परक्याच्या घरात आपल्याला तशी वागणूक मिळत नाही काहीशी अशीच स्थिती सध्या दिसते आहे.तुमचा वापर केला जाणार होता हे त्यांना आधीच कळायला पाहिजे होते.दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होते ज्या घरात सोन्याच्या ताटात जेवण मिळत होते तिथे तुम्हालाच पत्रावळीवर जायची इच्छा झाली आणि शिंदे गटाने स्वतःचे वाटोळे करून घेतले अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेलाही जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले.माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,मृत्यूनंतर आत्म्याच्या गोष्टी बोलल्या जातात म्हणजे यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे.शरद पवार जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना एनडीएनध्ये निर्माण झालेली दिसते.“यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही” असे अजित पवार म्हणाले.ही काय प्रचाराची पातळी झाली का ? एखाद्या वयोवृद्ध माणसाने शंभर वर्षे जगावे असे आपण बोलतो पण हे त्यांच्या मृत्यूची वाट बघायला लागले आहेत हे महाराष्ट्र हे सहन करणार नाही असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले आहे.
संविधान बदलणार ही भाजपाची घोषणा !!
४०० हून अधिक जागा मिळाल्यानंतर संविधान बदलू अशी घोषणा भाजपाच्या १५ खासदारांनी जाहीर मंचावरून बोलतांना दिली होती व त्यानंतर हा विषय अंगावर येतोय असे दिसल्यानंतर भाजपाने पुन्हा माघार घेतली असल्याचे चित्र आहे.दरम्यान निवडणूक रोख्यात चोरी कुणी केली ? हे वेगळे सांगायला नको.निवडणूक रोख्यांची माहिती बाहेर काढल्यास भारतात हाहाःकार माजेल असे सरकारी वकील तुषार मेहता यांनी सांगितले आहे.सर्वोच्च न्यायालयाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माहिती उघड करण्यास सांगितले व सर्वोच्च न्यायालयाच्या आग्रही भूमिकेमुळेच भारतातील सर्वात मोठा भ्रष्टाचार उघडीस आाला असून जगातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने केला असल्याचे उघड झाले आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.